जामखेडमध्ये आरोग्याचा महायज्ञ! जगदंब प्रतिष्ठानच्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांची मोठी गर्दी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठान, जामखेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज मेनपेठ येथील विठ्ठल मंदिरात हे शिबिर पार पडले.
या महाआरोग्य शिबिरात विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करण्यात आली. हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग, त्वचारोग, संधिवात, कंबरदुखी, पाठदुखी तसेच अॅनिमिया यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांबाबत डॉक्टरांनी नागरिकांना तपासणीसह आवश्यक आरोग्य मार्गदर्शन केले.
शिबिरात CBC, रक्तातील साखर (BSL), ECG, SpO₂, रक्तदाब आणि नाडी तपासणी यांसारख्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. सात तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी करून आरोग्यविषयक सल्ला दिला.
या उपक्रमासाठी लॅब असोसिएशन तसेच केमिस्ट असोसिएशनचेही सहकार्य लाभले. जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश निमोणकर व उपाध्यक्ष बाळासाहेब जगदाळे यांनी नागरिकांनी या आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले होते. संजय काका काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आरोग्य तपासणी वेळेवर झाल्यास विविध आजारांचे प्राथमिक स्तरावर निदान होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरला.
जामखेडमध्ये आरोग्याचा महायज्ञ! जगदंब प्रतिष्ठानच्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांची मोठी गर्दी