२५ वर्षांच्या निष्ठेची पावती! डॉ. भगवानराव मुरूमकर यांची भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जामखेडच्या राजकारणातील अनुभवी नेतृत्वाला राज्यस्तरीय जबाबदारी, कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत
गेल्या पंचवीस वर्षांपासून भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीसाठी सातत्याने काम करणारे जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर यांची भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याने जामखेड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या निवड सोहळ्यात डॉ. भगवानराव मुरूमकर यांची अधिकृत निवड करण्यात आली. यावेळी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा. जि. प. सदस्य अशोक (काका) खेडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अजय (दादा) काशिद, जामखेड भाजप तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, माजी उपसभापती रवि (दादा) सुरवसे, मा. जिल्हा प. सदस्य सोमनाथ पाचरणे, राहुल चोरगे, भाऊ गरड आदी मान्यवर उपस्थित होते.
२५ वर्षांची निष्ठा, संघर्ष आणि पक्षकार्याची पावती
डॉ. भगवानराव मुरूमकर हे जामखेड तालुक्यातील अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. मागील पंचवीस वर्षांपासून त्यांनी भाजपच्या माध्यमातून विविध जबाबदाऱ्या सांभाळत पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी योगदान दिले आहे.
त्यांनी सलग पाच वर्षे जामखेड पंचायत समितीचे सभापती, तसेच दहा वर्षे पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. याशिवाय पाच वर्षे साकत गावचे सरपंच म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, ग्रामस्थ आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांशी सातत्याने जोडलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यामुळे जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न राज्यस्तरावर मांडण्यासाठी डॉ. मुरूमकर यांना महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सध्या शेतकरी विविध नैसर्गिक संकटे, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, कृषी निविष्ठा आणि आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. त्यामुळे किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
त्यांच्या निवडीमुळे जामखेड तालुका भाजप व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, या नियुक्तीमुळे जामखेडच्या राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.