Wednesday, September 9, 2026
Home ताज्या बातम्या गणेशोत्सवापूर्वी जामखेड पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’! रूट मार्चने शहर दणाणले, बसस्थानकात जमाव विसर्जनाची...

गणेशोत्सवापूर्वी जामखेड पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’! रूट मार्चने शहर दणाणले, बसस्थानकात जमाव विसर्जनाची रंगीत तालीम

0
2
गणेशोत्सवापूर्वी जामखेड पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’! रूट मार्चने शहर दणाणले, बसस्थानकात जमाव विसर्जनाची रंगीत तालीम

जामखेड न्युज – – – – – 

गणेशोत्सवापूर्वी जामखेड पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’! रूट मार्चने शहर दणाणले, बसस्थानकात जमाव विसर्जनाची रंगीत तालीम

आगामी बैलपोळा आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जामखेड पोलिसांकडून बुधवारी (दि. ९ सप्टेंबर) रूट मार्च तसेच जमाव विसर्जनाची रंगीत तालीम घेण्यात आली. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार घेण्यात आलेल्या या सरावामुळे पोलिसांची सज्जता अधोरेखित झाली.

आज दुपारी १२.२५ ते १.३५ वाजेपर्यंत रूट मार्च काढण्यात आला. जामखेड पोलीस ठाणे येथून सुरू झालेला हा रूट मार्च बीड कॉर्नर, मेन पेठ, खर्डा चौक, तपनेश्वर रोड, नूरानी कॉलनी, सदाफुली वस्ती या मार्गाने काढण्यात आला.
यावेळी जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, एपीआय अजित मोरे, पीएसआय किशोर गावडे, पीएसआय गणेश आघाव, पीएसआय खेडकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच खर्डा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस मुख्यालय अहिल्यानगर येथील सहायक फौजदार अन्वर सय्यद, डीआय तसेच होमगार्ड यांचा सहभाग होता.

रूट मार्चनंतर जामखेड बसस्थानक येथे जमाव विसर्जनाची रंगीत तालीम घेण्यात आली. सहायक फौजदार अन्वर सय्यद यांच्या उपस्थितीत झालेल्या या सरावामध्ये पोलिसांनी संभाव्य परिस्थिती हाताळण्याचे प्रात्यक्षिक केले.

सरावादरम्यान स्टेन सेल, लाठ्या व ढालींचा वापर करण्यात आला.
आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून तहसील कार्यालयाच्या वतीने मंडळ अधिकारी येरप्पा काळे, जामखेड नगरपरिषदेची अग्निशमन गाडी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी उपस्थित ठेवण्यात आली होती. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेसोबतच आपत्कालीन वैद्यकीय मदत व अग्निशमन यंत्रणाही सज्ज असल्याचे दिसून आले.

आगामी बैलपोळा आणि गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वाहतूक सुरळीत राहावी आणि सण-उत्सव शांततेत पार पडावेत, यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
सदर रूट मार्च व जमाव विसर्जनाची रंगीत तालीम दुपारी १.३५ वाजता शांततेत पार पडली. आगामी उत्सव काळात नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!