Home ताज्या बातम्या लोकसहभागातून उभी राहिली ‘ज्ञानगंगा’, बावीच्या जिल्हा परिषद शाळेची तालुक्यात आदर्श वाटचाल ...

लोकसहभागातून उभी राहिली ‘ज्ञानगंगा’, बावीच्या जिल्हा परिषद शाळेची तालुक्यात आदर्श वाटचाल ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक, मुख्याध्यापक अमोल पवार यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार

0
3
लोकसहभागातून उभी राहिली ‘ज्ञानगंगा’, बावीच्या जिल्हा परिषद शाळेची तालुक्यात आदर्श वाटचाल  ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक, मुख्याध्यापक अमोल पवार यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार

जामखेड न्युज – – – – – – 

लोकसहभागातून उभी राहिली ‘ज्ञानगंगा’, बावीच्या जिल्हा परिषद शाळेची तालुक्यात आदर्श वाटचाल

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक, मुख्याध्यापक अमोल पवार यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार

 

 

गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग, शिक्षकांचे समर्पण, माजी विद्यार्थ्यांची साथ आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांच्या जोरावर जामखेड तालुक्यातील बावी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने ग्रामीण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेच्या २०२४-२५ टप्पा क्रमांक दोनमध्ये तालुकास्तरीय द्वितीय क्रमांकाचा दोन लाख रुपयांचा पुरस्कार मिळवून या शाळेने आपल्या गुणवत्तेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे शाळेचे पदवीधर शिक्षक तथा मुख्याध्यापक अमोल पंढरीनाथ पवार यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

बावी शाळेच्या विकासामागे केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता गावकऱ्यांनी उभारलेला लोकसहभाग हा प्रमुख आधार ठरला आहे. पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी संघ, शिक्षणप्रेमी नागरिक आणि शिक्षकांनी एकत्र येत सुमारे सहा लाख रुपयांपेक्षा अधिक लोकवर्गणी उपलब्ध करून शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये मोठी भर घातली. त्यामुळे शाळेचा परिसर अधिक सुरक्षित, आकर्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आनंददायी झाला आहे.

डिजिटल शिक्षणामुळे ज्ञानाच्या नव्या वाटा
शाळेत प्रोजेक्टर, टॅब, इंटरॲक्टिव्ह बोर्ड, स्मार्ट टीव्ही तसेच वाय-फाय नेटवर्कशी जोडलेला आधुनिक संगणक कक्ष उपलब्ध आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या माध्यमातून ई-लर्निंग साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना आनंददायी आणि आधुनिक पद्धतीने शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून नवे ज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळत आहे.

शाळेत चार प्रशिक्षित शिक्षक असून सर्व शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ व २ उत्तीर्ण आहेत. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत ७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर विशेष भर
नवोदय, शिष्यवृत्ती, मिशन आरंभ, मंथन आदी परीक्षांसाठी दररोज अतिरिक्त तासिका घेतल्या जातात. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता चौथीचे चार विद्यार्थी, इयत्ता पाचवीची एक विद्यार्थिनी आणि इयत्ता सातवीचे दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरले.
विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती, वाचनक्षमता आणि सामान्यज्ञान वाढविण्यासाठी ‘वुई लर्न इंग्लिश’, ‘मी ज्ञानी होणार’, तारखेनुसार पाढे पाठांतर, स्पेलिंग बी, रीडिंग बेल, वाचन महोत्सव, वॉटर बेल आणि कुसुमाग्रज वाचन अभियान यांसारखे विविध उपक्रम राबविले जातात.

‘अ’ श्रेणीसह गुणवत्तेची मोहोर
शाळेला शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) मध्ये ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धा तसेच विविध गुणदर्शन स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी होत असून केंद्रस्तर व तालुकास्तरावर यश संपादन करत आहेत.
हिरवाईने नटलेला शाळेचा परिसर
बावी शाळेचा परिसर हिरवाईने नटलेला असून सुमारे १८ प्रकारच्या वनस्पतींचे २४० हून अधिक देशी वृक्ष येथे लावण्यात आले आहेत. विविध वेली व फुलझाडांमुळे शाळेचा परिसर आकर्षक बनला आहे. सर्व झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते.
पावसाचे पाणी अडविण्यासाठी वॉटर हार्वेस्टिंग, ‘जलतारा’ उपक्रमांतर्गत शोषखड्डा, कचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खत खड्डा आणि परसबाग अशा पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. परसबागेतील विविध भाज्यांचा वापर शालेय पोषण आहारात केला जातो.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाही प्राधान्य
विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगशिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. मुला-मुलींसाठी स्वतंत्र वाहत्या पाण्याची सुविधा असलेली शौचालये, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कमोड व व्हीलचेअर, हॅन्डवॉश स्टेशन आणि सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन अशा सुविधाही शाळेत उपलब्ध आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीची नळ सुविधा, मोटर, दोन कूपनलिका आणि RO वॉटर फिल्टरची सुविधा आहे.
‘अभ्यासाची बेल’ ठरली प्रेरणादायी
शाळा आणि ग्रामपंचायत बावी यांच्या समन्वयातून ‘अभ्यासाची बेल’ हा अभिनव उपक्रम राबविला जातो. दररोज सायंकाळी सात वाजता सायरन वाजल्यानंतर गावातील मोबाईल व टीव्ही बंद ठेवण्याचे आवाहन केले जाते. रात्री सात ते नऊ या वेळेत विद्यार्थी अभ्यास करतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नियमित अभ्यासाची सवय लागली असून शैक्षणिक गुणवत्तेतही लक्षणीय सुधारणा झाल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.

क्रीडा, वाचन आणि अनुभवाधारित शिक्षण
विद्यार्थ्यांसाठी मैदान, लाल माती, विविध खेळांचे साहित्य, दर्जेदार बेंच व फर्निचर उपलब्ध आहे. शैक्षणिक सहली, क्षेत्रभेटी, वनभोजन, पालक मेळावे, विद्यार्थी गृहभेटी आणि वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जाते.
परिसरातील व्यावसायिकांच्या भेटी व मुलाखतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनाशी संबंधित अनुभवाधारित ज्ञान दिले जाते. ग्रंथालय, पुस्तके, दैनिक वर्तमानपत्रे आणि पेपर स्टँडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण केली जात आहे.
लोकसहभागातून ‘बोलक्या भिंती’
‘मिशन आपुलकी’ अंतर्गत मिळालेल्या लोकसहभागातून शाळेच्या भिंतींवर शैक्षणिक माहिती, सुविचार, आकर्षक चित्रे आणि नकाशे रंगविण्यात आले आहेत. त्यामुळे शाळेच्या भिंतीच विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे माध्यम बनल्या आहेत. शाळेसाठी भव्य प्रवेशद्वाराची कमान, संरक्षक भिंत, सोलार सिस्टिम, इन्व्हर्टर-बॅटरी, प्रिंटर, माइक व साऊंड सिस्टिम अशा विविध सुविधा लोकसहभागातून उभारण्यात आल्या आहेत.
इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेकडे ओढा
चालू शैक्षणिक वर्षात परिसरातील इंग्लिश मीडियम शाळांमधून तब्बल नऊ विद्यार्थ्यांनी बावी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या अध्यापनाबद्दल समाधान व्यक्त करत पालकांनी शाळेवर विश्वास दाखविला आहे. ग्रामीण भागातील सरकारी शाळांकडे पालकांचा वाढता कल ही बावी शाळेच्या गुणवत्तेची पावती मानली जात आहे.
शिक्षण, संस्कार, योग, आरोग्य, तंत्रज्ञान, हिरवाई आणि लोकसहभाग यांचा सुरेख समन्वय साधत बावीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ग्रामीण भागातील शिक्षणाचे ‘मॉडेल’ ठरत आहे. ‘शाळेला गावाचा आधार आणि गावाला शाळेचा अभिमान’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या या ज्ञानगंगेच्या वाटचालीत मुख्याध्यापक अमोल पवार यांच्यासह शिक्षक, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि शालेय व्यवस्थापन समितीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे.
शब्दांकन : अमोल पंढरीनाथ पवार, पदवीधर शिक्षक तथा मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बावी

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!