जामखेड न्युज – – – – – –
कुकडीला हजारो कोटींची मंजुरी, जामखेड मात्र पाण्याच्या प्रतीक्षेत!
कुकडीसोबत कृष्णा-भीमा स्थिरीकरणातूनही तालुका वंचित, ‘जामखेडच्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी कधी?’ — अवधूत पवार
कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या ₹५,७०४.५० कोटींच्या सुधारित खर्चास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पातून १,४४,९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रखडलेल्या कामांना गती मिळून दुष्काळी भागातील शेतीला स्थैर्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असतानाच, या जलनियोजनात जामखेड तालुक्याचा समावेश नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
कुकडी प्रकल्पाच्या माध्यमातून जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा आदी भागांना पाण्याचा लाभ मिळणार आहे.

मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून कुकडीच्या पाण्याची प्रतीक्षा करणारा दुष्काळी जामखेड तालुका या जलनियोजनापासून वंचितच असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी केला आहे.
कृष्णा-भीमा योजनेतही जामखेडला स्थान नाही
कुकडी प्रकल्पाबरोबरच कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेतही जामखेड तालुक्याचा समावेश नसल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे राज्यातील मोठ्या जलप्रकल्पांच्या नियोजनात जामखेडचा विचार नेमका का होत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दक्षिण अहिल्यानगर दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध जलप्रकल्पांचा उपयोग होणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, दक्षिण अहिल्यानगरमधील दुष्काळी तालुका असलेल्या जामखेडपर्यंत हा जलनियोजनाचा लाभ कधी पोहोचणार? असा प्रश्न शेतकरी आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.





