जामखेड न्युज – – – – –
सुगंधित तंबाखू, मावा, गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांचा धडाका!
एमआयडीसी, जामखेड व बेलवंडी हद्दीत ७ ठिकाणी छापे, १४ आरोपींवर गुन्हे, सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध गुटखा, मावा व सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एमआयडीसी, जामखेड व बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ७ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत १४ आरोपींविरुद्ध ७ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे २ लाख ९९ हजार ९९० रुपये किमतीचा पानमसाला (गुटखा), मावा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मटुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संतोष खैरे, शाहीद शेख, संदिप पवार, राहुल हारके, प्रशांत राठोड, अरुण गांगुडे, भिमराज खसे, योगेश कडले, विशाल तनपुरे, रोहित मिसाळ, दिपक जाधव, गणेश धोत्रे, अमोल कोतकर, अमोल आजबे, मनोज साखरे, प्रकाश माडगे व प्रताप देवकाते यांच्या तीन पथकांनी कारवाई केली.

जामखेडसह विविध भागांत छापे
२८ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी एमआयडीसी, जामखेड व बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुगंधित तंबाखू, मावा आणि गुटखा विक्री करणाऱ्यांची माहिती मिळवून विविध ठिकाणी छापे टाकले.
कारवाईदरम्यान संबंधितांकडून प्रतिबंधित पानमसाला, गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखू असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांत भारतीय न्याय संहितेसह अन्न सुरक्षा व औषध प्रशासनाशी संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सात कारवायांमध्ये १४ आरोपी
कारवाईच्या नोंदीनुसार एमआयडीसी हद्दीत १, जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ आणि बेलवंडी हद्दीत १, अशा एकूण ७ कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमध्ये एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जामखेड पोलीस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे व कारवाईचा तपशील:
नान्नज परिसर: नान्नज येथे कारवाई करून गणेश शिवाजी गोरे (वय २८), विशाल शिवाजी वटाणे (वय २८), वृषभ राजेंद्र पोते (वय २४) आणि योगेश लक्ष्मण मोहोळकर (वय २४) यांच्यावर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या चौघांकडून सुगंधी तंबाखू व मावा जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणात माल पुरवणारा आप्पा कुमटकर (रा. राजेगाव, ता. जामखेड) हा फरार घोषित करण्यात आला आहे.





