Saturday, August 29, 2026
Home शैक्षणिक बातम्या कोयता फेकून पुस्तक हातात देत मस्तक घडवणारे आत्मकथन म्हणजे काजवा’ — डॉ....

कोयता फेकून पुस्तक हातात देत मस्तक घडवणारे आत्मकथन म्हणजे काजवा’ — डॉ. नरसिंग कदम पोपट काळे यांच्या ‘काजवा’ आत्मकथनातून संघर्ष, शिक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी उलगडते

0
2
कोयता फेकून पुस्तक हातात देत मस्तक घडवणारे आत्मकथन म्हणजे काजवा’ — डॉ. नरसिंग कदम   पोपट काळे यांच्या ‘काजवा’ आत्मकथनातून संघर्ष, शिक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी उलगडते

जामखेड न्युज – – – – – 

‘कोयता फेकून पुस्तक हातात देत मस्तक घडवणारे आत्मकथन म्हणजे काजवा’ — डॉ. नरसिंग कदम

पोपट काळे यांच्या ‘काजवा’ आत्मकथनातून संघर्ष, शिक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी उलगडते

पिढ्यानपिढ्या ऊसतोडीचा कोयता हातात घेऊन संघर्ष करणाऱ्या कुटुंबातून शिक्षणाच्या बळावर अधिकारीपदापर्यंत पोहोचलेल्या पोपट काळे यांच्या जीवनप्रवासाचे प्रभावी चित्रण ‘काजवा’ या आत्मकथनातून झाले आहे. ‘कोयता फेकून पुस्तक हातात देत मस्तक घडवणारे आत्मकथन म्हणजे काजवा’, असे मत डॉ. नरसिंग कदम यांनी व्यक्त केले.

‘काजवा’ ही केवळ पोपट काळे यांची आत्मकथा नसून, शिक्षणाच्या माध्यमातून अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणाऱ्या संपूर्ण कोयतेधारी समाजाची संघर्षगाथा असल्याचे डॉ. कदम यांनी नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या विचारांचा प्रत्यय या आत्मकथनातून येतो.

पोपट काळे यांच्या जीवनात शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी घेतलेला संघर्ष अत्यंत महत्त्वाचा ठरला. विशेषतः आई मुक्ताबाई यांनी अनेक अडचणींवर मात करत मुलाला शिक्षणापासून दूर जाऊ दिले नाही. अशिक्षित असूनही सामाजिक वास्तव आणि शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी अट्टाहास केला. त्यामुळे ऊसतोडीच्या परंपरागत जीवनातून बाहेर पडण्याची वाट पोपट काळे यांच्यासाठी खुली झाली.

या आत्मकथनात आक्रस्ताळेपणा, अतिशयोक्ती किंवा प्रसिद्धीसाठी कृत्रिम प्रसंगांचा आधार घेतलेला नाही. स्वतःच्या आयुष्यातील सुख-दुःख, अनुभव, संघर्ष, यश-अपयश आणि त्यातून मिळालेले धडे पोपट काळे यांनी अत्यंत प्रामाणिक व ओघवत्या शैलीत मांडले आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सत्यनिष्ठा, पारदर्शकता आणि प्रगल्भता अधोरेखित होते, असे डॉ. कदम यांनी सांगितले.
‘कोयता’ ते ‘पुस्तक’—पिढ्यांचा बदल
कोयतेधारी कुटुंबांमध्ये मोठ्या मुलांवर लहान भावंडांची जबाबदारी येते. तसेच वर्षातील अनेक महिने ऊसतोडीसाठी स्थलांतर करावे लागत असल्याने अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अशा परिस्थितीत पोपट काळे यांच्या जीवनातही शिक्षण सोडून परंपरागत व्यवसाय स्वीकारण्याची वेळ आली होती. मात्र आईच्या जिद्दीमुळे त्यांचे शिक्षण सुरू राहिले.

शिक्षणाच्या जोरावर स्वतःचे जीवन बदलल्यानंतर त्यांनी आपल्या भावंडांनाही शिक्षण दिले आणि संपूर्ण कुटुंबाच्या हातातील कोयता काढून पुस्तक हातात दिले. आई-वडिलांच्या स्वप्नातील घर उभे केले, मुलांना शिक्षण दिले आणि गावाशी असलेली नाळ कायम जपली. त्यामुळे ‘काजवा’ हा एका व्यक्तीचा नव्हे, तर एका कुटुंबाच्या पिढ्यानपिढ्यांच्या परिवर्तनाचा दस्तऐवज ठरतो.

प्रामाणिक अधिकारी कसा असावा, याचाही आदर्श
पोपट काळे यांनी अधिकारी म्हणून काम करताना शिस्त आणि कडकपणाबरोबरच संवेदनशीलता व समजूतदारपणाला महत्त्व दिले. शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. व्यसनाच्या आहारी गेलेल्या शिक्षकांना योग्य मार्गावर आणणे, नोकरी वाचवणे, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न सोडवणे, शाळांमधील वाद संवादातून मिटवणे, अतिक्रमणाचे प्रश्न प्रेमाने सोडवणे, अशा अनेक प्रसंगांतून त्यांनी ‘दंडशाहीपेक्षा समजूतदारपणा महत्त्वाचा’ असल्याचा आदर्श निर्माण केला.

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात आरोप-प्रत्यारोप आणि अग्निपरीक्षा येत असतात. अशा वेळी डगमगून न जाता ‘सत्यमेव जयते’ या विचारावर विश्वास ठेवून उभे राहण्याची प्रेरणा पोपट काळे यांच्या जीवनातून मिळते. त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित झाले तेव्हा पत्नी ताराबाई यांनीही खंबीरपणे साथ दिली. कुटुंबाच्या विश्वासामुळेच संघर्षाच्या काळातही त्यांना ताकद मिळाली.

शिक्षणातून अंधार दूर करण्याचा संदेश
‘काजवा’ आत्मकथनाचा केंद्रबिंदू म्हणजे शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हा विचार. हातातील कोयता सोडून पुस्तक हातात घेतल्यामुळे एका कुटुंबाच्या जीवनात प्रकाश आला. हा प्रकाश पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील मुलांच्या हातात पुस्तक आले पाहिजे, त्यांनी शिक्षण घेतले पाहिजे आणि परंपरागत दारिद्र्याची साखळी तोडली पाहिजे, असा संदेश या आत्मकथनातून मिळतो.

“ज्यांच्या घरात सुखाचा लवलेश नव्हता, संघर्ष आणि उपासमार पाचवीला पुजलेली होती, त्या घरातील मुलाने शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आणि पुस्तक हातात धरले. त्यामुळे हातातील कोयता कायमचा सुटला आणि घरादारात सुखाचा प्रकाश निर्माण झाला. हाच प्रकाश प्रत्येकाच्या घरात पोहोचला पाहिजे,” असे प्रतिपादन डॉ. नरसिंग कदम यांनी केले.

डॉ. नरसिंग कदम, सदस्य—मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य, मुंबई तथा प्रोफेसर, छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर यांनी ‘काजवा’ आत्मकथनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या मते, संघर्षातून घडलेले आयुष्य, शिक्षणाची ताकद आणि प्रामाणिक सेवेचा आदर्श सांगणारे ‘काजवा’ हे प्रत्येकाने वाचावे असे प्रेरणादायी आत्मकथन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!