Friday, August 28, 2026
Home ताज्या बातम्या बस थांबा की तळीरामांचा अड्डा? जामखेडच्या जुन्या बस स्थानकासमोरील थांब्यावर प्रवाशांची फरफट,...

बस थांबा की तळीरामांचा अड्डा? जामखेडच्या जुन्या बस स्थानकासमोरील थांब्यावर प्रवाशांची फरफट, महामंडळाचे डोळे कधी उघडणार? उन्हात-पावसात प्रवासी उघड्यावर; बसही थांबेना! अस्वच्छता, दुर्गंधी अन् वाढलेले गवतामुळे बस थांबा बनला गैरप्रकारांचा अड्डा

0
2
बस थांबा की तळीरामांचा अड्डा? जामखेडच्या जुन्या बस स्थानकासमोरील थांब्यावर प्रवाशांची फरफट, महामंडळाचे डोळे कधी उघडणार?  उन्हात-पावसात प्रवासी उघड्यावर; बसही थांबेना! अस्वच्छता, दुर्गंधी अन् वाढलेले गवतामुळे बस थांबा बनला गैरप्रकारांचा अड्डा

जामखेड न्युज – – – – 

बस थांबा की तळीरामांचा अड्डा? जामखेडच्या जुन्या बस स्थानकासमोरील थांब्यावर प्रवाशांची फरफट, महामंडळाचे डोळे कधी उघडणार?

उन्हात-पावसात प्रवासी उघड्यावर; बसही थांबेना! अस्वच्छता, दुर्गंधी अन् वाढलेले गवतामुळे बस थांबा बनला गैरप्रकारांचा अड्डा

शहरातील जुन्या बस स्थानकासमोर एच. यु. गुगळे यांच्या सौजन्याने उभारण्यात आलेला बस थांबा सध्या प्रवाशांसाठी सोयीचा ठरण्याऐवजी अडचणीचा ठरत आहे. बस थांबा असूनही बस येथे थांबत नसल्याने प्रवाशांना उन्हात-पावसात उघड्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे हा बस थांबा नेमका प्रवाशांसाठी आहे की केवळ नावापुरता, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

या बस थांब्याची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी गैरप्रकार वाढत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. प्रवाशांसाठी उभारलेला बस थांबा आता तळीरामांचा अड्डा बनल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, मागील वर्षभरात या परिसरात दोन बेवारस मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या ठिकाणची सुरक्षितता आणि स्वच्छता याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी ग्रामीण प्रवासी संघटनेचे निवेदन, तरीही प्रशासन सुस्त

प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रवासी संघटनेच्या वतीने सुमारे पंधरा दिवसांपूर्वी जामखेड बस प्रशासनाला निवेदन देऊन हा बस थांबा तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप या निवेदनाची कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप प्रवासी संघटनेने केला आहे.

बस थांबा उपलब्ध असतानाही बस तेथे थांबत नसल्याने प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागते. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

बस थांबा स्वच्छ करून तातडीने सुरू करण्याची मागणी

बस थांब्याची तातडीने स्वच्छता करावी, वाढलेले गवत काढावे, परिसर सुरक्षित व स्वच्छ ठेवावा आणि महामंडळाच्या सर्व संबंधित बस या ठिकाणी थांबतील याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेचे सागर गुंदेचा यांनी केली आहे.

“बस थांबा असूनही प्रवाशांना उघड्यावर उभे राहावे लागत असेल, तर हा बस थांबा असून अडचण नसून खोळंबाच आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बस थांबा सुरू करावा,” अशी मागणी सागर गुंदेचा यांनी केली.

महामंडळाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय आणखी किती दिवस सुरू राहणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, प्रशासनाने आता तरी जागे होऊन या बस थांब्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!