जामखेड न्युज – – – – – –
गणेश मंडळांनो, लक्ष द्या! परवानगीसाठी आता ऑनलाइनच अर्ज, जामखेड पोलिसांचा स्पष्ट आदेश
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने गणेश मंडळांसाठी परवानगी प्रक्रियेबाबत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. दि. १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव होणार असून, गणेश मंडळांची स्थापना तसेच मिरवणूक व इतर कार्यक्रमांसाठी आवश्यक परवानगी घेण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.

गणेश मंडळे तसेच संबंधित नागरिकांना परवानगीसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या Citizen Portal वर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी वेळेत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन जामखेड पोलिसांनी केले आहे.

ऑनलाइन अर्ज भरताना मंडळाच्या अध्यक्षांनी मंडळाच्या सदस्यांची संपूर्ण माहिती, गणेश मंडळाची स्थापना करण्यात येणारी जागा, विसर्जनाचा मार्ग, मिरवणुकीची तारीख व वेळ तसेच कार्यक्रमासंदर्भातील आवश्यक माहिती सविस्तरपणे नमूद करणे आवश्यक आहे. अर्जातील माहितीची पडताळणी केल्यानंतर नियमानुसार परवानगी देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, ऑनलाइन अर्जाव्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपातील अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे जामखेड पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी शेवटच्या क्षणाची धावपळ टाळून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




