जामखेड न्युज – – – – – –
अहिल्यानगरमध्ये इतिहास घडला! 5 लाख 25 हजार 511 भाविकांचे एकाच वेळी “वंदे मातरम्” गायन, विश्वविक्रम प्रस्थापित,
सरला बेटाच्या रामगिरी महाराजांच्या सप्ताहात राष्ट्रभक्तीचा महासागर

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली आहे. श्री क्षेत्र धनगरवाडी येथे संत योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त तब्बल ५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच ठिकाणी, एकाच वेळी ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
२५ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीक्षेत्र सरला बेटचे विद्यमान मठाधिपती महंत श्री रामगिरी महाराज यांच्या आयोजनाखाली हा भव्य उपक्रम पार पडला. लाखो भाविकांनी एकाच वेळी राष्ट्रगीतासमान आदर असलेल्या ‘वंदे मातरम्’चे गायन केल्याने संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला..

मागील विश्वविक्रमापेक्षा पाचपट अधिक सहभाग
‘वंदे मातरम्’चे एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी केलेल्या सामूहिक गायनाचा यापूर्वीचा विश्वविक्रम १ लाख ४ हजार ६३७ सहभागींच्या नावावर होता. १२ जानेवारी २०१० रोजी पुणे येथे ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन’च्या ‘अंतर्नाद’ संगीत कार्यक्रमात हा विक्रम नोंदविण्यात आला होता.
मात्र, धनगरवाडी येथे झालेल्या या उपक्रमात ५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी सहभाग घेत मागील विक्रमापेक्षा तब्बल चारपट अधिक संख्येने सामूहिक गायन केले. त्यामुळे हा उपक्रम ऐतिहासिक ठरला.
मान्यवरांच्या हस्ते विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र
या ऐतिहासिक विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र विनर्स बुक ऑफ रेकॉर्ड्स वर्ल्डचे अध्यक्ष आणि १८४ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय डॉ. दीपक हरके, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीक्षेत्र सरला बेटचे मठाधिपती महंत श्री रामगिरी महाराज यांना प्रदान करण्यात आले.





