जामखेड न्युज – – – – –
पावसाने दिला दगा, सोयाबीन करपले, मूग-उडिद वाया! — जामखेड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती, बळीराजाचे लक्ष आभाळाकडे
कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची मागणी

जामखेड तालुक्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलै महिन्यात अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन, मूग, उडिद यांसह विविध पिकांची पेरणी केली. सुरुवातीला काही दिवस रिमझिम पाऊस झाल्याने पिकांनी उभारी घेतली; मात्र त्यानंतर पावसाने तब्बल महिनाभर दडी मारल्याने पिके अक्षरशः करपू लागली आहेत. सध्या ढग मोठ्या प्रमाणात येत आहेत त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सोयाबीनची पिके पाण्याअभावी सुकून गेली असून अनेक ठिकाणी मूग आणि उडिद पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. महागामोलाचे बियाणे, खते, मशागत आणि पेरणीचा खर्च करून शेतकऱ्यांनी उभा केलेला खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. जामखेड तालुक्यातील सोयाबीन चे आगार साकत परिसरातील सोयाबीन पीक करपून चालली आहेत.

ओढ, नदी-नाले कोरडे; तळ्यांनी गाठला तळ
पावसाने पाठ फिरवल्यामुळे तालुक्यातील ओढे, नदी-नाले, विहिरी आणि तलावांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या असून तळ्यांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्यासोबतच काही भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

ढग येतात, पण पाऊस काही पडत नाही!
सध्या आकाशात मोठ्या प्रमाणात ढग दाटून येत आहेत. त्यामुळे पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहते. मात्र ढग येतात आणि काही वेळातच निघून जातात; प्रत्यक्षात पावसाचा थेंबही पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ‘आज येईल, उद्या येईल’ या आशेवर बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.




