जामखेडची नागपंचमी : चाळ, टाळ अन् कुस्ती आखाड्याची समृद्ध परंपरा नागपंचमी म्हटली की जामखेडची चाळ-टाळ आणि कुस्ती आखाड्याची सांस्कृतिक, धार्मिक आणि क्रीडा परंपरांचा संगम
जामखेडची नागपंचमी : चाळ, टाळ अन् कुस्ती आखाड्याची समृद्ध परंपरा
नागपंचमी म्हटली की जामखेडची चाळ-टाळ आणि कुस्ती आखाड्याची सांस्कृतिक, धार्मिक आणि क्रीडा परंपरांचा संगम
नागपंचमीचा सण जामखेडमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमीच्या निमित्ताने शहरातील सुमारे आठ ते दहा ठिकाणी चाळ-नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांना महाराष्ट्राच्या विविध भागांतून शौकीन उपस्थित राहत असल्याने जामखेडच्या नागपंचमीला राज्यभरात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
नागपंचमीच्या दिवशी पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशे, वाद्यांचा गजर आणि चाळ-नृत्याच्या कार्यक्रमांनी शहरातील वातावरण उत्साहाने भारून जाते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेमुळे ‘जामखेडची नागपंचमी आणि चाळ’ हे समीकरण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात परिचित झाले आहे.
मात्र, गेल्या काही वर्षांत जामखेडच्या नागपंचमीच्या उत्सवाला भक्तीची नवी जोड मिळाली आहे. शहरातील श्रीनागेश्वर मंदिरात सप्ताहाचे आयोजन तसेच पालखी सोहळा सुरू झाल्याने चाळीसोबत टाळ-मृदुंगाच्या भक्तिमय गजराची परंपराही रुजली आहे. वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार होणाऱ्या या कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जामखेडची ओळख आता ‘चाळाकडून टाळाकडे’ अशीही निर्माण होत आहे.
२४ वर्षांची कुस्ती आखाड्याची परंपरा जामखेडच्या नागपंचमी उत्सवाचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कुस्तीचा आखाडा. कै. विष्णू वस्ताद यांच्या स्मरणार्थ अजय काशीद मित्र परिवाराच्या वतीने गेल्या २४ वर्षांपासून कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात येते. या आखाड्यात महाराष्ट्रासह देशभरातील नामांकित मल्ल सहभागी होत असल्याने कुस्तीप्रेमींसाठी हा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.
मातीच्या आखाड्यातील कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह दूरदूरवरून कुस्तीशौकिनांची गर्दी होते. पारंपरिक कुस्तीला प्रोत्साहन देण्याबरोबरच नवोदित मल्लांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कामही या आखाड्याच्या माध्यमातून केले जात आहे.
सांस्कृतिक, धार्मिक आणि क्रीडा परंपरांचा संगम चाळ-नृत्याची सांस्कृतिक परंपरा, श्रीनागेश्वर मंदिरातील सप्ताह व पालखीचा भक्तिमय सोहळा आणि कुस्ती आखाड्याचा रोमांचक थरार, या तिन्हींच्या संगमामुळे जामखेडची नागपंचमी वैशिष्ट्यपूर्ण ठरते. काळानुसार उत्सवाचे स्वरूप बदलत असले तरी परंपरेची मुळे कायम ठेवत जामखेडकरांनी नागपंचमीची ओळख अधिक व्यापक केली आहे.
त्यामुळे ‘चाळ, टाळ अन् आखाडा’ ही जामखेडच्या नागपंचमीची त्रिसूत्री ठरत असून, या परंपरेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही जामखेडकर जपत आहेत.