Tuesday, August 11, 2026
Home ताज्या बातम्या रस्त्यावर मृत्यूशी झुंज देणाऱ्या जखमीला संजय कोठारींचा मदतीचा हात, प्रसंगावधानाने वाचवले प्राण

रस्त्यावर मृत्यूशी झुंज देणाऱ्या जखमीला संजय कोठारींचा मदतीचा हात, प्रसंगावधानाने वाचवले प्राण

0
2
रस्त्यावर मृत्यूशी झुंज देणाऱ्या जखमीला संजय कोठारींचा मदतीचा हात, प्रसंगावधानाने वाचवले प्राण

जामखेड न्युज – – – – – 

रस्त्यावर मृत्यूशी झुंज देणाऱ्या जखमीला संजय कोठारींचा मदतीचा हात, प्रसंगावधानाने वाचवले प्राण

मंदिराच्या कामानिमित्त बारामतीकडे जात असताना रस्त्यावर अपघातग्रस्त अवस्थेत बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला तातडीने मदत करून सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. कोठारी यांच्या प्रसंगावधानामुळे जखमी व्यक्तीला वेळीच वैद्यकीय मदत मिळून त्याचा जीव वाचविण्यास मोठी मदत झाली.

काल संजय कोठारी हे आपल्या मित्रांसमवेत मंदिराच्या कामानिमित्त बारामतीकडे जात होते. यावेळी करमाळा रोडवर माहीजळगावपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर पाटेगाव फाट्याजवळ त्यांना रस्त्यावर एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेली दिसली. सदर व्यक्तीच्या अंगावर मोटारसायकल पडलेली होती.

त्याचवेळी या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने जात असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक होती.

कोठारी यांनी काही अंतर पुढे गेल्यानंतर तातडीने वाहन वळवून पुन्हा घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सर्वप्रथम जखमी व्यक्तीच्या अंगावर पडलेली मोटारसायकल बाजूला केली. संबंधित व्यक्तीच्या तोंडाला व हाताला दुखापत झालेली होती आणि तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संजय कोठारी यांनी तातडीने मिरजगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. तसेच १०८ रुग्णवाहिकेलाही फोन करून तातडीने घटनास्थळी येण्याची विनंती केली. काही वेळातच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनीही तत्परतेने कार्यवाही करून जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.

दरम्यान, जखमी व्यक्तीच्या मोबाईलवरून त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून अपघाताची माहिती देण्यात आल्याचे संजय कोठारी यांनी सांगितले.
या मदतकार्यात संजय कोठारी यांच्यासोबत असलेले मनोज भंडारी, संजय गुंदेचा, विनोद बेदममुथा, विनोद बोरा, सुनील चोरडिया आणि सुरज खेत्रे यांनीही सहकार्य केले.

अपघाताच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी संजय कोठारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. रस्त्यावर अपघातग्रस्त व्यक्ती दिसताच पुढे न जाता तातडीने मदतीसाठी धाव घेणे, पोलिस व रुग्णवाहिकेला माहिती देणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे या घटनेतून दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!