जामखेड तालुक्यात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल मूर्तीची अज्ञातांकडून विटंबना, खर्डा पोलिसांत गुन्हा दाखल
जामखेड तालुक्यातील प्रकल्पग्रस्त वाकी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून विठ्ठलाच्या मूर्तीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंदिराचे पुजारी भैरवनाथ अर्जुन सोनार (वय ३३, रा. वाकी) यांच्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, भैरवनाथ सोनार हे गेल्या सुमारे दहा वर्षांपासून मंदिरात पुजारी म्हणून सेवा बजावत आहेत. १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी नियमित पूजा करून मंदिर बंद करून ते घरी गेले होते.
त्यानंतर २ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ वाजता मंदिर उघडण्यासाठी आल्यानंतर मंदिराचे लोखंडी गेट अर्धवट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.मंदिरात प्रवेश करून पाहिले असता, विठ्ठलाच्या मूर्तीच्या मानेजवळील भागाचे नुकसान झाल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक आणि मंदिराशी संबंधित व्यक्तींनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता रात्री मंदिरात कोणी आल्याचे कुणालाही दिसले नसल्याचे समोर आले.
त्यानंतर अज्ञात व्यक्तीने मंदिरात प्रवेश करून विठ्ठलाच्या मूर्तीचे नुकसान केल्याची खात्री झाल्यानंतर पुजारी भैरवनाथ सोनार यांनी खर्डा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे वाकी परिसरात संतापाची लाट पसरली असून, मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गोकुळ इंगोले करत आहेत.