जामखेड न्युज – – –
कोरोना लगाम लावण्यासाठी सध्या देशभरात लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. दुसरीकडे आरोग्य तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नीती आयोगाने केंद्र सरकारला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचा सल्ला दिला असताना आता केंद्रीय गृहमंत्रालयाच्या पॅनेलनेही पंतप्रधान कार्यालयाला सतर्क करत इशारा दिला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट अंतर्गत नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सरकारला इशाला दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येऊ शकते. यात खासकरून प्रौढांपेक्षा लहान मुलांना अधिक धोका असून त्यांच्या उपचारासाठी वैद्यकीय तयारी करावी, अशी सूचना समितीने केली आहे.
ही समिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशावरून स्थापन करण्यात आली आहे. लहान मुलांवर उपचार सुविधा, डॉक्टर, स्टाफ, वैद्यकीय उपकरणं उदा. व्हेंटिलेटर्स, अॅम्ब्युलन्स इत्यादी बाबींची सुविधा उपलब्ध करावी. तसंच अंदापेक्षाही अधिक लहान मुलांना करोनाचा संसर्ग झाल्यास कुठल्याही गोष्टीचा सामना करण्यासाठी तयारी ठेवावी, असं समितीने पंतप्रधान कार्यालयाला दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.
लहान मुलांना प्राधान्याने कोरोनावरील लस देणं गरजेचं आहे. खासकरून गंभीर आजार असलेल्या आणि व्यंग असलेल्या मुलांना लस द्यावी. करोनाची तिसरी लाट ऑक्टोबर अखेर टिपेला पोहोचू शकते. यामुळे विविध संस्थांकडून लाटेबाबत अंदाज घेण्याची सूचना द्यावी, असं समितीने अहवालात म्हटलं आहे. अनेक अभ्यासातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तण्यात आला आहे.
लहान मुलांना करोनावरील लस देण्यात येत नसल्याने त्यांना संसर्गाचा अधिक धोका आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग गंभीर होत नाही. पण लहान मुलांद्वारे इतरांना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तर दुसऱ्या लाटेपेक्षा करोनाची तिसरी लाटही तेवढी धोकादायक नसेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आलं आहे.






