Home ताज्या बातम्या संत तुळसापुरी महाराजांचा संजीवन सोहळा भक्तिभावात संपन्न पालखी मिरवणूक, एकनाथी भारूड...

संत तुळसापुरी महाराजांचा संजीवन सोहळा भक्तिभावात संपन्न पालखी मिरवणूक, एकनाथी भारूड व महाप्रसादाने भुतवडा परिसर झाला भक्तिमय, पहा काय म्हणाले मान्यवर

0
4

जामखेड न्युज – – – – – 

संत तुळसापुरी महाराजांचा संजीवन सोहळा भक्तिभावात संपन्न

पालखी मिरवणूक, एकनाथी भारूड व महाप्रसादाने भुतवडा परिसर झाला भक्तिमय, पहा काय म्हणाले मान्यवर

 

जामखेड नगरपरिषदेच्या हद्दीतील भुतवडा येथे आषाढी एकादशीनंतरच्या दुसऱ्या दिवशी रविवारी संत श्री तुळसापुरी महाराज यांचा संजीवन सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी भुतवडा गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले.


सोहळ्यानिमित्त संत तुळसापुरी महाराजांची प्रतिमा आकर्षक पालखीत विराजमान करून वाद्यवृंदाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावनाचे कलश घेऊन सहभाग नोंदविला, तर पुरुषांनी डफाच्या तालावर लेझीम खेळत मिरवणुकीत रंग भरला. संपूर्ण गाव ‘जय तुळसापुरी महाराज’च्या जयघोषाने दुमदुमून गेले.

मिरवणूक संत तुळसापुरी महाराजांच्या वास्तव्यास असलेल्या मार्गाने जात जिवंत समाधी मंदिरात दाखल झाली. तेथे भाविकांनी समाधीची विधीवत पूजा, आरती करून संतांचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

मान्यवरांचे संत तुळसापुरी महाराजांविषयी गौरवोद्गार 

यावेळी दर्यापूर येथे कार्यरत असलेले जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा भुतवडा गावचे सुपुत्र सत्यवान डोके यांनी संत तुळसापुरी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, नाथपंथीय परंपरेतील संत तुळसापुरी महाराज यांनी समाजाला आध्यात्मिक ज्ञान, मानवतेचा संदेश आणि दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी जीवन अर्पण केले. संत तुळसापुरी महाराजांच्या कार्यातून समाजाला सदाचार, नैतिकता आणि मानवतेचा संदेश मिळतो. संतांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

अमित चिंतामणी –
संत परंपरेने समाजात ऐक्य आणि बंधुभाव निर्माण केला आहे. अशा धार्मिक सोहळ्यांमुळे समाज एकत्र येत असून संस्कारांची जपणूक होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवाजी डोके –
संत तुळसापुरी महाराजांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या शिकवणुकीतून सेवा, त्याग आणि समाजहिताचा संदेश मिळतो. हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

ॲड. हर्षल डोके –
संतांचे विचार हे समाजाला योग्य दिशा देणारे आहेत. युवकांनी संतांच्या आदर्शांचा स्वीकार करून समाजकार्यात सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.

नगरसेवक श्रीराम डोके –
धार्मिक आणि सामाजिक परंपरा जपण्यासाठी अशा सोहळ्यांचे महत्त्व मोठे आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रा. अनिल डोके –
संत साहित्य आणि संतांची शिकवण ही समाजासाठी प्रेरणादायी आहे. संत तुळसापुरी महाराजांनी दिलेला मानवतेचा संदेश प्रत्येकाने जीवनात आचरणात आणावा, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

सोहळ्यानिमित्त हनुमान मंदिरासमोर भारूडरत्न कृष्णा जोगडंद यांच्या एकनाथी भारूडाचा रंगतदार कार्यक्रम झाला. त्यांच्या भारूडातून समाजप्रबोधनासह अध्यात्माचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचा महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी मनमुराद आनंद घेतला.

या प्रसंगी गटविकास अधिकारी महेश डोके, उद्योजक शिवाजी डोके, जामखेड नगराध्यक्ष अमित चिंतामणी, नगरसेवक श्रीराम डोके, प्रविण होळकर, अॅड हर्षल डोके, जयसिंग डोके, अनिल डोके, सचिन डोके, गणेश डोके, राहुल डोके, बजरंग डोके, संजय डोके, अशोक डोके, ज्येष्ठ पत्रकार अशोक निमोणकर, नासीर पठाण, सुदाम वराट, मयूर भोसले यांच्यासह ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भक्ती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम घडविणारा संत तुळसापुरी महाराजांचा संजीवन सोहळा यंदाही अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!