जामखेड न्युज – – – – –
जामखेड पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्प गतीने पूर्ण करण्याचे निर्देश – सभापती प्रा. राम शिंदे
पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर
जामखेड शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा योजना व मलनिस्सारण प्रकल्पाची कामे विहित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. या प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्र व मलनिस्सारण प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करून नागरिकांना या सुविधांचा लवकर लाभ मिळेल, यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

जामखेड नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेबाबत आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, मुख्याधिकारी अजय साळवे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

करमाळा येथून येणाऱ्या जलवाहिनीच्या उर्वरित कामाचा आढावा घेताना वनविभागाच्या परवानगीची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उर्वरित १२ किलोमीटर जलवाहिनीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तत्काळ संबंधित विभागाकडे सादर करून कामाला अपेक्षित गती द्यावी, असे निर्देश देण्यात आले.

मुख्य बाजारपेठेतील जलवाहिनीच्या कामाच्या अनुषंगाने आवश्यक समन्वयातून कामे सुरळीतपणे पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली. खर्डा चौक ते बीड कॉर्नर या मुख्य मार्गावरील काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस प्रशासनाचे सहकार्य घ्यावे. योग्य समन्वयातून विकासकामे अखंडितपणे सुरू ठेवावीत, असे त्यांनी सांगितले.





