Saturday, July 18, 2026
Home ताज्या बातम्या शाळकरी विद्यार्थ्यांना मिळणार ‘अजितदादा’ यांच्या कार्याची ओळख, जामखेड तालुक्यात २१३ शाळांना...

शाळकरी विद्यार्थ्यांना मिळणार ‘अजितदादा’ यांच्या कार्याची ओळख, जामखेड तालुक्यात २१३ शाळांना मिळणार फोटो फ्रेम भेट

0
2

जामखेड न्युज – – – – – – 

शाळकरी विद्यार्थ्यांना मिळणार ‘अजितदादा’ यांच्या कार्याची ओळख,

जामखेड तालुक्यात २१३ शाळांना मिळणार फोटो फ्रेम भेट

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा तथा अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या संध्याताई सोनवणे यांच्या पुढाकारातून जामखेड तालुक्यात एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आगामी जयंतीनिमित्त तालुक्यातील २१३ प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालये आणि महाविद्यालयांना त्यांच्या छायाचित्राची आकर्षक फोटो फ्रेम सप्रेम भेट देण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना अजितदादा पवार यांच्या प्रशासकीय कार्यशैली, शिस्त, वक्तशीरपणा आणि लोकहिताच्या निर्णयांची माहिती मिळावी तसेच त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेता यावी, हा असल्याचे संध्याताई सोनवणे यांनी सांगितले.

प्रत्येक शाळेच्या मुख्य कार्यालयात किंवा प्रार्थना सभागृहात ही फोटो फ्रेम लावण्यात येणार असून, विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, ध्येयवादी वृत्ती आणि सार्वजनिक जीवनाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास या उपक्रमाची मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी जामखेड तालुक्यातील शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इच्छुक शाळांनी शाळेचे नाव, यू-डायस (UDISE) कोड, मुख्याध्यापकांचे नाव आणि संपर्क क्रमांक यासह माहिती अर्ज सादर करायचा आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळेला सन्मानपूर्वक फोटो फ्रेम प्रदान करण्यात येणार आहे.

संध्याताई सोनवणे या राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय राहिल्या आहेत. जामखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांपर्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची ओळख पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.

आयोजकांनी तालुक्यातील सर्व शाळांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा व आवश्यक माहिती अर्ज लवकरात लवकर सादर करावा, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!