बीएसएनएल अहिल्यानगर जिल्हा सल्लागार समितीवर पोपटराव गायकवाड यांची नियुक्ती खा. निलेश लंके यांच्या शिफारशीनंतर केंद्राकडून नियुक्ती; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
बीएसएनएल अहिल्यानगर जिल्हा सल्लागार समितीवर पोपटराव गायकवाड यांची नियुक्ती
खा. निलेश लंके यांच्या शिफारशीनंतर केंद्राकडून नियुक्ती; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या अहिल्यानगर जिल्हा सल्लागार समितीवर जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील ज्येष्ठ पत्रकार व माजी सरपंच पोपटराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार निलेश लंके यांच्या शिफारशीनुसार बीएसएनएलच्या चेअरपर्सन व व्यवस्थापकीय संचालक उर्वशी संगवान यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे जामखेड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात समाधान व्यक्त होत असून विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पोपटराव गायकवाड यांनी पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कार्याचा प्रदीर्घ अनुभव मिळवला आहे. त्यांनी दैनिक लोकमत व दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्रांचे जामखेड तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. तसेच जातेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
याशिवाय अहमदनगर (सध्याचे अहिल्यानगर) जिल्हा पत्रकार संघाचे सचिव तसेच जामखेड तालुका सरपंच संघाचे सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. विविध क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा लाभ बीएसएनएलच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी व्हावा, या उद्देशाने खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडे त्यांच्या नावाची शिफारस केली होती.
त्यानुसार केंद्र सरकारने त्यांच्या नावाला मान्यता देत बीएसएनएलच्या अहिल्यानगर जिल्हा सल्लागार समितीवर नियुक्ती केली. नियुक्तीनंतर बीएसएनएलच्या अहिल्यानगर कार्यालयात खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पोपटराव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बीएसएनएलच्या सेवा अधिक सक्षम, जलद, अखंडित व ग्राहकाभिमुख करण्यासाठी सल्लागार समितीने प्रभावी भूमिका बजावावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
पोपटराव गायकवाड यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, आमदार रोहित पवार, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, पत्रकार नासीर पठाण, संतराम सुळ, वसंत सानप, सुदाम वराट, अशोक निमोणकर, मैनोद्दीन तांबोळी, मिठदलाल नवलाखा, दीपक देवमाने, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, ओंकार दळवी, समीर शेख, अशोक वीर, धनराज पवार, संजय वारभोग, निलेश वनारसे, विजय अवसरे, नंदूसिंग परदेशी, फारुख शेख, संतोष थोरात, दत्तराज पवार, बाळासाहेब वराट, प्रकाश खंडागळे, अनिकेत चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.