पुण्यातील कुख्यात घायवळ टोळीतील दोन फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
पुणे शहरातील कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेले दोन आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मा. मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
खर्डा (ता. जामखेड) येथील फिर्यादी विजयसिंह कल्याणराव गोळेकर यांना आरोपी रोहित उर्फ बबळू बाबासाहेब गोळेकर (वय २७, रा. खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) याने फोन करून पुण्यात दाखल असलेल्या संघटित गुन्हेगारी प्रकरणात तुझे नाव वापरले असल्याचे सांगत २० लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
खंडणी न दिल्यास गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुतकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूपूर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून रोहित उर्फ बबळू गोळेकर याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान कोथरूड पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला ज्ञानेश्वर उर्फ माऊली दगडू तोंडे (वय ४०, रा. खेबरे, ता. मुळशी, जि. पुणे) यालाही सोलापूर-अहिल्यानगर महामार्गावरील उड्डाणपुलाजवळून अटक करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, रोहित गोळेकर याच्याविरुद्ध एकूण सात तर ज्ञानेश्वर तोंडे याच्याविरुद्ध सहा गंभीर गुन्हे दाखल असून दोघेही पुण्यातील कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित आहेत. या आरोपींवर खंडणी, संघटित गुन्हेगारी, शस्त्र बाळगणे आणि जीवे मारण्याच्या धमक्यांसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुतकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालमुळे, पोलीस अंमलदार राहुल बरके, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, राहुल डोके, अमोल आजबे, मनोज साखरे, प्रशांत रणशेठ, सतीश भवर आणि चालक महादेव भांड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.