जामखेडच्या लक्ष्मीताई पवार राष्ट्रीय गुणगौरव पुरस्काराने सन्मानित
सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल
सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरण क्षेत्रात गेली अनेक वर्षे उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जामखेड येथील ‘जनविकास सेवाभावी संस्थे’च्या संस्थापिका सौ. लक्ष्मीताई किशोर पवार यांना मुंबई येथे आयोजित भव्य सोहळ्यात ‘बी द चेंज फाऊंडेशन’ च्या वतीने “राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार २०२६”प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आयोजित या राष्ट्रीय कार्यक्रमात सौ. लक्ष्मीताई पवार यांच्या समाजहिताच्या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
१५ दिवसांपूर्वी शिर्डीतही झाला होता सन्मान ‘बी द चेंज फाऊंडेशन’च्या वतीनेच सौ. लक्ष्मीताई पवार यांना गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शिर्डी येथे ‘राजस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. अवघ्या १५ दिवसांत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील दोन प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाल्याने जामखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
वंचितांसाठी झटणाऱ्या सेवाभावी नेतृत्व सौ. पवार यांनी समाजातील वंचित, गरजू व दुर्बल घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. महिला सक्षमीकरण, शिक्षणाचा प्रसार, सामाजिक जनजागृती आणि समाजसेवा या क्षेत्रातील त्यांच्या भरीव कार्यामुळेच त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला आहे.
“हा सन्मान माझ्या कुटुंबीयांचा” – लक्ष्मीताई पवार पुरस्कार स्वीकारताना सौ. लक्ष्मीताई किशोर पवार यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबीय, सहकारी आणि समाजातील सर्व शुभचिंतकांना समर्पित केला. तसेच भविष्यातही समाजोपयोगी कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव या राष्ट्रीय सन्मानामुळे त्यांच्या कार्याचा गौरव झाला असून जामखेडसह अहमदनगर जिल्ह्यातून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
“राज्यातून थेट राष्ट्रीय पातळीवर झेप – लक्ष्मीताईंच्या कार्याला सलाम”