जामखेड न्युज – – – – – –
जामखेडमध्ये ‘न्यूजपेपर फूड’चा कॅन्सर!
वर्तमानपत्रात गुंडाळून मिळताहेत वडापाव-भजी, आरोग्य धोक्या, अन्न व औषध प्रशासन झोपेतच
“गरमागरम भजी घ्या, कुरकुरीत वडापाव…” पण तो कशात दिला जातोय? कालच्या बातम्यांच्या कागदात! जामखेड शहर व तालुक्यातील हॉटेल, टपऱ्या व हातगाड्यांवर सर्रास वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ दिले जात असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र अहिल्यानगरचे अन्न व औषध प्रशासन (FDA) मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

नेमका धोका काय?
1. शाईचे विष: वर्तमानपत्र छापण्यासाठी वापरण्यात येणारी शाई लेड, कॅडमियम, ग्राफाइट यांसारख्या घातक रसायनांनी बनलेली असते. गरम तेलकट पदार्थांचा संपर्क येताच ही शाई वितळून अन्नात मिसळते.

2. FSSAI ने घातली बंदी: भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने 2016 मध्येच वर्तमानपत्रात अन्नपदार्थ गुंडाळण्यावर पूर्ण बंदी घातली आहे. हा कायदेशीर गुन्हा आहे.
3. कॅन्सरचा धोका: FSSAI च्या अहवालानुसार न्यूजपेपरच्या शाईमुळे पचनसंस्थेचे आजार, किडनी फेल, लिव्हर डॅमेज व कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

4. अस्वच्छता: रस्त्यावर पडलेले, धुळीने माखलेले, अनेकांच्या हाताळणीतून गेलेले पेपर थेट तोंडात जाणाऱ्या अन्नासाठी वापरणे म्हणजे रोगांना आमंत्रण.

जामखेडची परिस्थिती:
शहरातील बसस्थानक परिसर, खर्डा रोड, बीड रोड, नगर रोड, बीड रोड, आठवडे बाजार येथील ८०% पेक्षा जास्त वडापाव, भजी, भेळ, समोसा विक्रेते ग्राहकांना थेट पेपरमध्येच पदार्थ देतात. शाळकरी मुले, कामगार, महिला हे विष रोज खात आहेत.




