Friday, May 15, 2026
Home ताज्या बातम्या कर्जत-जामखेडमधील सिंचनाच्या प्रश्नावर आ. रोहित पवार आक्रमक कुकडीचे उन्हाळी आवर्तन, बंधारे-दुरुस्ती...

कर्जत-जामखेडमधील सिंचनाच्या प्रश्नावर आ. रोहित पवार आक्रमक कुकडीचे उन्हाळी आवर्तन, बंधारे-दुरुस्ती आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सिंचन भवनात महत्त्वपूर्ण बैठक

0
2

जामखेड न्युज – – – – – 

कर्जत-जामखेडमधील सिंचनाच्या प्रश्नावर आ. रोहित पवार आक्रमक

कुकडीचे उन्हाळी आवर्तन, बंधारे-दुरुस्ती आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सिंचन भवनात महत्त्वपूर्ण बैठक

उन्हाच्या तीव्रतेमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न होत असून आमदार रोहित पवार यांनी आज या विषयावर शेतकऱ्यांसह पुण्यात सिंचन भवन येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत कुकडी प्रकल्पाचे दुसरे उन्हाळी आवर्तन तातडीने सोडणे, सीना व विंचरणा नदीवरील बंधारे आणि तलावांची दुरुस्ती करणे, तसेच शेतकऱ्यांचे झालेले नुकसान रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता (ID) अलका अहिरराव, (SP) संजीव चोपडे, सहाय्यक मुख्य अभियंता श्रीजित थोरात, सहाय्यक मुख्य अभियंता श्री शिवाजी जाधव, पृथ्वीराज फाळके यांच्यासह अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे मतदारसंघात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कुकडीचे दुसरे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावर कार्यवाही न झाल्याने आता तातडीने आवर्तनाचे नियोजन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. २५ मे पर्यंत कुकडीचे दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे, मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्यापूर्वीच आवर्तन सोडण्याचा आग्रह यावेळी आमदार रोहित पवार यांनी धरला. तसेच हे आवर्तन ३६ दिवसांचे असावे, अशी ठाम मागणीही त्यांनी या बैठकीत लावून धरली. कुकडीच्या आवर्तनासोबतच सीना प्रकल्पातील लाभधारक शेतकरी आणि पिण्याचे पाणी यासाठी सीना प्रकल्पातूनही तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

सीना प्रकल्पातील विविध कामांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणीही या बैठकीत करण्यात आली. याशिवाय कर्जत-जामखेड मतदारसंघातील विंचरणा नदीवरील कवडगाव, गिरवली, पिंपरखेड येथील बंधाऱ्यांची दुरुस्ती तसेच सीना नदीवरील जवळा, निमगाव डाकू, चौंडी, मलठण, निमगाव गांगर्डा या गावातील बंधाऱ्यांच्या बाजूस मोठ्या प्रमाणात घळ पडल्याचा आणि त्याची तातडीने दुरुस्ती होण्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. नदीपात्राचा प्रवाह बदलल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आगामी पावसाळ्यात आणखी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच नायगाव येथील सांडवा खचल्यामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीकडेही आ. रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आणि तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि आगामी काळात पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ही सर्व कामे युद्धपातळीवर हाती घेऊन ती पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.

याशिवाय बैठकीत कुकडी प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दाही जोरदारपणे मांडण्यात आला. मुख्य व उपकालव्यांची दुरुस्ती, कालव्यांतील गाळ काढणे, गळती रोखण्यासाठी अस्तरीकरण करणे, चारीवरील गेट बसविणे यासह अनेक प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी निधीची गरज आहे. हा निधी देण्याची मागणीही यावेळी केली. दरम्यान, या सर्व प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी, मतदारसंघातील पदाधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजच्या बैठकीतील निर्णय
– २५ मेपर्यंत कुकडीचे आवर्तन सोडणार परंतु ते आणखी लवकर सोडण्याचा प्रयत्न.
– कुकडीच्या गेटची दुरुस्ती करण्याची निविदा तातडीने काढणार.
– सीना नदीवरील बंधाऱ्यांची दुरुस्ती पूर्ण करणार.
– मोहरी तलावाच्या दुरुस्तीचे कार्यादेश देण्यात आले. एका महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन.
– सीनाचे आवर्तन उद्या (शनिवार, १६ मे) सोडण्यात येणार..
– नायगावच्या बंधाऱ्याची दुरुस्ती एक महिन्यात करणार.
– अस्तरीकरणाची छोटी-मोठी कामे तातडीने हाती घेणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!