Thursday, October 8, 2026
Home ताज्या बातम्या नान्नज दरोड्याचे धागेदोरे थेट सात गावांपर्यंत, पाच आरोपी ताब्यात जामखेडच्या घरफोडी टोळीवर...

नान्नज दरोड्याचे धागेदोरे थेट सात गावांपर्यंत, पाच आरोपी ताब्यात जामखेडच्या घरफोडी टोळीवर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचा सर्जिकल स्ट्राईक, लाखोंचे सोने हस्तगत

0
2
नान्नज दरोड्याचे धागेदोरे थेट सात गावांपर्यंत, पाच आरोपी ताब्यात जामखेडच्या घरफोडी टोळीवर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचा सर्जिकल स्ट्राईक, लाखोंचे सोने हस्तगत

जामखेड न्युज – – – – – – 

नान्नज दरोड्याचे धागेदोरे थेट सात गावांपर्यंत, पाच आरोपी ताब्यात
जामखेडच्या घरफोडी टोळीवर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचा सर्जिकल स्ट्राईक, लाखोंचे सोने हस्तगत

तालुक्यातील नान्नज परिसरातील जवळा येथे घरात घुसून कोयता व चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकणाऱ्या टोळीचा अखेर स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, जामखेड तालुक्यातील राजुरी, डोळेवाडी, आरणगाव, धामणगाव, वंजारवाडी, बुऱ्हाणपूर आणि चौंडी आदी ठिकाणी केलेल्या घरफोडी व चोरीचे गुन्हेही उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून ६ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे दोन वाजता नान्नज येथील जवळा परिसरातील फिर्यादी मनिषा श्रीमंत गोरे (वय ४५) यांच्या घरी अनोळखी आरोपींनी प्रवेश केला. कुटुंबीयांना चाकू व कोयत्याचा धाक दाखवून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेण्यात आली होती. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७५/२०२६, बीएनएस कलम ३१०(२) अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर घटनेनंतर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दरोड्याचा समांतर तपास करून आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला.

पिंपळगाव आवळ्यातून पाच जण ताब्यात तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे हा दरोडा प्रदीप उर्फ गुड्या बिडकुत्या काळे याने साथीदारांसह केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने पिंपळगाव आवळा परिसरात कारवाई करून प्रदीप उर्फ गुड्या बिडकुत्या काळे (३०), अनिल सुल्या पवार (३४), सुविकास बिडकुत्या काळे (४५), रूक्या उर्फ लोकेश बिडकुत्या काळे (३५) आणि समाधान उर्फ कारभारी दीपक काळे (२९) यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींकडून या दरोड्यासह इतर घरफोडी व चोरीच्या घटनांची माहिती समोर आली. तपासात लवचिक्या उर्फ लहु जालींदर पवार, सोन्या नंग्या काळे, परबत उर्फ प्रभाकर उर्फ दीपक तुकाराम शिंदे आणि सारिका चंदन काळे हे आरोपी फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जामखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरफोड्या
समाधान उर्फ कारभारी दीपक काळे याने चौकशीत साथीदारांसह राजुरी, डोळेवाडी, आरणगाव, धामणगाव, वंजारवाडी, बुऱ्हाणपूर व चौंडी येथे रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

चोरी केलेले सोन्याचे दागिने ओळखीच्या व्यक्तींकडे ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधितांना चौकशीसाठी नोटिसा बजावल्या. त्यांच्याकडून पंचांसमक्ष सोन्याची अंगठी, मंगळसूत्र, बोरमाळ, सोन्याचे मणीमंगळसूत्र, गंठण व कर्णफुले असा एकूण ६,९२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जामखेड व खर्डा पोलिस ठाण्यांतील गुन्हे उघड
या तपासातून जामखेड व खर्डा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले जबरी चोरी व घरफोडीचे आणखी नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामुळे नन्नज येथील दरोड्यासह एकूण १० गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

ताब्यातील रूक्या उर्फ लोकेश बिडकुत्या काळे याला जामखेड पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात हजर करण्यात आले असून, तो २०१५ मधील एका गुन्ह्यातही पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

फरार आरोपींचा शोध सुरू
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना चोरीच्या मुद्देमालासह नन्नज दरोडा प्रकरणाच्या पुढील तपासासाठी जामखेड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून, या टोळीशी संबंधित आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे तसेच पोलीस अंमलदार निळकंठ कारखेले, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, बाळासाहेब खेडकर, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, प्रशांत राठोड, सुनीता पवार व अरुण मोरे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!