जामखेड येथे दोन दिवसीय बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
जामखेड येथे FA सागर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेले दोन दिवसीय बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले. हे शिबिर लोंढे हॉस्पिटल अँड ICU येथे संपन्न झाले. या शिबिरात जामखेड परिसरातील सुमारे २० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शिबिरामध्ये नवशिक्या, मध्यम व प्रगत स्तरातील खेळाडूंना बुद्धिबळातील ओपनिंग तत्त्वे, टॅक्टिक्स, मिडलगेम योजना, एंडगेम तंत्र, चेकमेट पॅटर्न्स, कॅल्क्युलेशन, पझल सॉल्विंग, स्पर्धात्मक विचारसरणी तसेच खेळातील मानसिक तयारी याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात प्रशिक्षक नितू सागर गांधी यांनीही विद्यार्थ्यांना अतिशय उत्साहपूर्ण पद्धतीने मार्गदर्शन केले व विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाबद्दल आवड निर्माण केली.
विद्यार्थ्यांसाठी विविध सराव उपक्रम, पझल स्पर्धा व रॅपिड सामने आयोजित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पुरस्कार डॉ आनंद लोंढे आणि डॉ भक्ती लोंढे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
समारोप प्रसंगी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे शैक्षणिक, मानसिक व वैयक्तिक आयुष्यातील फायदे समजावून सांगितले. त्यांनी बुद्धिबळामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती, निर्णयक्षमता व संयम वाढतो असे सांगितले.
तसेच Alzheimer’s Disease सारख्या स्मरणशक्ती कमी होणाऱ्या आजारांमध्येही बुद्धिबळ उपयुक्त ठरते, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यात अशा अधिक उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.