जामखेड नगरपरिषदेच्या लाचखोर कर्मचाऱ्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी
जामखेड नगरपरिषदेतील जन्म दाखला देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लिपिक अभिजीत भैसडे व अहमद शेख यांना सत्र न्यायालय, श्रीगोंदा येथे हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत नगरपरिषदेतील लिपिक अभिजीत जालिम भैसडे व अहमद शेख यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. फिर्यादीकडून जन्म दाखला देण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणामुळे जामखेड नगरपरिषदेत खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांकडून विविध दाखल्यांसाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नगरपरिषदेच्या भ्रष्टाचारी चिंगळ्या पकडल्या आता शार्क माशावर कारवाई कधी – आमदार रोहित पवार
जामखेड नगरपरिषेतील भ्रष्ट कारभाराचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज जाहीर पंचनामा केला. जन्म दाखला देण्यासाठी ३ हजार रुपये लाचेची मागणी केल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लिपीक आणि मदतनीस अशा दोघांवर कारवाई केली, पण हे दोघेही केवळ छोट्या छोट्या चिंगळ्या आहेत.
नगरपरिषद प्रशासनातील भ्रष्टाचारातला सर्वांत मोठा शार्क मासा सर्वांना माहित असून तो मात्र यातून अद्याप नामानिराळा आहे.. आधी भ्रष्टाचाराच्या पाण्यात पोहणाऱ्या या शार्क माशाला कारवाईच्या जाळ्यात अडकवून पाण्याबाहेर काढण्याची गरज आहे. असं केलं तरच बाकीच्या चिंगळ्याही नीट काम करतील आणि जामखेडकरांची भ्रष्ट कारभाराच्या त्रासातून सुटका होईल.