जामखेड न्युज ——–
रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग विरोधात पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी आपल्या टीमसह रस्त्यावर
सिमेंट रस्त्यावर वाहने पार्किंग केल्यास कारवाई

जामखेड शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलत पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी स्वतः आपल्या फौज फाट्यासह रस्त्यावर उतरत बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. समज देऊनही वाहने जर सिमेंट रस्त्यावर पार्किंग केले तर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्गालगत दोन्ही बाजूंनी रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांविरोधात जामखेड पोलीसांनी विशेष मोहिम राबविली. व कारवाई चा बडगा उगारला.

शहरातील वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासोबतच रस्त्यावरच होणारे दुतर्फा पार्किंग हे त्यामागील प्रमुख कारण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारत शिस्त लावण्याचा निर्धार केला आहे.

यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी वाहनधारकांना स्पष्ट इशारा देत सांगितले की, सिमेंट रस्त्यावर कोणत्याही परिस्थितीत वाहने पार्किंग करू नयेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल तसेच गरज भासल्यास वाहने जप्त करण्यात येतील. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून इतरांना अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, ही कारवाई केवळ एकदिवसीय नसून पुढील काळात दररोज सकाळी व सायंकाळी नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली. या मोहिमेत पीएसआय कान्हेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल पळसे, घोळवे, चव्हाण, बेलेकर, दळवी, परदेशी तसेच होमगार्ड तांबोळी यांच्या पथकाने सहभाग घेतला.




