जामखेड न्युज—–
जामखेडमध्ये वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, माँर्निग वाँक वेळी चैन स्नॅचिंगच्या घटना, सार्वजनिक ठिकाणी दारूच्या बाटल्याचा खच
पोलीसांनी गस्त वाढवावी राष्ट्रवादीचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

जामखेड शहरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून टवाळखोर आणि समाजकंटकांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरसेवक राजेंद्र गोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले असून, शहरातील संवेदनशील भागांमध्ये तात्काळ पोलीस गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.
माँर्निग वाँक वेळीही चैन स्नँकिंगचे प्रकार घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी अंजनाबाई जगताप फिरत असताना मोटार सायकल वर येणाऱ्या तिघांनी गळ्यातील चैन खेचली यामुळे त्या खाली पडल्या यात जखमी झाल्या तसेच सार्वजनिक ठिकाणी सकाळी व सायंकाळी फिरत असताना मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्याचा खच दिसतो, नागेश्वर मंदिर परिसर, शिवनेरी अकॅडमी परिसर विंचरणा नदी परिसर या ठिकाणी सायंकाळी मोठ्या प्रमाणात मद्य प्रेमी बसतात याचा त्रास फिरणाऱ्या नागरिकांना होत आहे. ताबडतोब पोलीसांनी याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
सार्वजनिक ठिकाणी दारूच्या बाटल्याचा खच
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे नागेश्वर मंदिर रोड आणि गुगळे प्लॉटिंग परिसर, नगरपरिषद कार्यालय, सार्वजनिक वाचनालय व नाना-नानी पार्क परिसर, शंकर मूर्ती पाठीमागील रस्ता, लेणीवाडी आणि भुतवडा रोड तसेच विंचरणा नदीकाठचा संपूर्ण परिसर या ठिकाणी समाजकंटकांचा वावर वाढल्याने नागरिकांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

सकाळी आणि सायंकाळी व्यायाम किंवा फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना, विशेषतः महिलांना, काही तरुण दुचाकीवरून वेगाने फिरत पाठलाग करून त्रास देत असल्याच्या घटना घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

तसेच काही निर्जन स्थळांवर आणि रस्त्याच्या कडेला उघडपणे धूम्रपान, मद्यपान तसेच इतर नशिल्या पदार्थांचे सेवन होत असल्याचेही नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. महिलांच्या दागिन्यांची चोरी करण्याचा प्रयत्न होणे, तसेच लहान मुलांसोबत असलेल्या महिलांना त्रास देणे अशा घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याशिवाय बसस्थानक, खर्डा चौक आणि नागेश विद्यालय परिसरात शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींचा पाठलाग करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.






