जागतिक महिला दिनी महिला वूशू खेळाडूंचा अपमान; ट्रॉफी देण्यास नकार सभापती प्रा. राम शिंदे यांच्या जिल्ह्यातील खेळाडूंच्या अपमाना बाबत सभापती काय निर्णय घेणार याकडे खेळाडूंचे लक्ष
जागतिक महिला दिनी महिला वूशू खेळाडूंचा अपमान; ट्रॉफी देण्यास नकार
सभापती प्रा. राम शिंदे यांच्या जिल्ह्यातील खेळाडूंच्या अपमाना बाबत सभापती काय निर्णय घेणार याकडे खेळाडूंचे लक्ष
जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे भारत सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत तसेच ऑल महाराष्ट्र वूशू असोसिएशन यांच्या वतीने अस्मिता खेलो इंडिया महिला वूशू लीग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मा. ना. रक्षाताई खडसे क्रीडा व युवक कल्याण भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात आले होते. या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीनियर महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी अहिल्यानगर महिला संघाचे नाव पुकारण्यात आले. त्यानंतर महिला खेळाडू ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मंचावर गेल्या. मात्र, ऑल महाराष्ट्र वूशू असोसिएशनचे सचिव सोपान कटके यांनी खेळाडूंना “तुम्ही कोणाचे विद्यार्थी आहात?” असा प्रश्न विचारला.
त्यावर खेळाडूंनी “आम्ही लक्ष्मण उदमले यांचे विद्यार्थी आहोत” असे सांगितले. हे ऐकल्यानंतर सोपान कटके यांनी त्या महिला खेळाडूंना ट्रॉफी देण्यास नकार देत “तुम्हाला ट्रॉफी दिली जाणार नाही” असे सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळे उपस्थितांसमोर महिला खेळाडूंचा अपमान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. सदर स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला खेळाडू या राष्ट्रीय स्तरावरील वूशू खेळाडू असून नुकतीच त्यांची ऑल इंडिया विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
लक्ष्मण उदमले हे अहमदनगर जिल्हा वूशू संघटनेचे सचिव असून ते आंतरराष्ट्रीय खेळाडू, एन. एस. एन. आय.एस. प्रशिक्षक तसेच राष्ट्रीय पंच म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडले आहेत. नुकतेच त्यांना अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला खेळाडूंचा अशा प्रकारे अपमान झाल्याने क्रीडा क्षेत्रात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी क्रीडाप्रेमींकडून होत आहे.
चौकट सभापती च्या जिल्ह्यातच महिला खेळाडूंचा अपमान
विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला खेळाडूंचा महिला दिनादिवशीच अपमान झाला आहे. याविषयी खेळाडूंचे शिष्टमंडळ सभापती प्रा. राम शिंदे यांना निवेदन देणार आहेत. त्यामुळे सभापती आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.