दादा, तुमचं जेवढं वय, तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द; रुपाली चाकणकरांचा वार

0
276
जामखेड न्युज – – – 
 राज्यपाल यांचं वय झालं आणि शरद पवार साहेब यांचं वय झालं नाही का?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर पलटवार करताना केला होता. त्याला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांतदादा, तुमचं जेवढं वय आहे तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द आहे, असा बोचरा वार रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
रुपाली चाकणकर यांनी एक व्हिडीओ ट्विट करून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. वयोमानामुळे राज्यपालांना लक्षात राहत नसावं म्हणून सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या असाव्यात असं शरद पवारांनी म्हटलं होतं. पवार बोलल्यानंतर चंद्रकांत पाटील राज्यपालांच्या मदतीला धावून गेले. पहिली गोष्ट राज्यपाल हे भाजपचे पदाधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांची बाजू घेण्याचा प्रश्नच नव्हता. दुसरी गोष्टी चंद्रकांतदादा तुमचं जितकं वय आहे, तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द आहे. हे कोथरूड व्हाया आमदार झालेल्या दादांनी लक्षात घ्यावं, असा टोला चाकणकर यांनी लगावला.
                         ADVERTISEMENT
 
आत्मचिंतन करा
दादा, तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात. चार दिवस दिल्लीत थांबूनही अमित शहा यांनी तुम्हाला भेट नाकारली. याचं जरा आत्मचिंतन करा. तेव्हाच कुणाच्या वयाचा काय मुद्दा आणि साहेबांवर काय बोलावं याचं तुम्हाला भान येईल, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यपालांना हाताशी धरुन अडवणूक
गेल्या दीड वर्षांपासून राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती रखडलेली आहे. ही नियुक्ती का रखडली आहे हे महाराष्ट्र पाहत आहे. राज्य सरकार आपल्या अधिकारात काही नावं राज्यपालांना देतात. राजकीय शिष्टाचारानुसार राज्यपाल ही नावं मान्य करतात. पण राज्यात आपली सत्ता नाही म्हणून राज्यपालांना हाताशी धरून अडवणूक करण्याचा कार्यक्रम केंद्राकडून सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली होती. राज्यपाल यांचं वय झालं आणि पवार साहेब यांचं वय झालं नाही का? कुणी कुणाच्या वयावर बोलू नये. सदस्यांची नियुक्ती करायची की नाही हा राज्यपालांचा अधिकार असल्याचे कोर्टाने देखील म्हटलं आहे, असं ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here