जामखेड न्युज—–
जवळा येथील श्री जवळेश्वर देवस्थानला ‘ ब वर्ग ‘ तिर्थक्षेत्र दर्जा प्राप्त, शासन निर्णय जारी.
सभापती प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

तालुक्यातील जवळा येथील श्री जवळेश्वर देवस्थानला ‘ ब ‘ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिध्द झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ( ब – वर्ग ) अंतर्गत श्री जवळेश्वर देवस्थान या “क” वर्ग ग्रामीण यात्रास्थळाचा “ब” वर्ग दर्जा देणेबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास २८ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्य निकष समितीच्या बैठकीत छाननी करण्यात आली. प्रस्ताव संदर्भीय शासन निर्णयातील निकषांनुसार परिपूर्ण सादर केला असल्याने, श्री जवळेश्वर देवस्थानास “ब वर्ग ” दर्जा देण्याबाबत शिफारस करण्यात आली होती.

दरम्यान श्री जवळेश्वर देवस्थानला ब वर्ग दर्जा देण्याबाबतची शिफारस विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत रितसर प्रस्ताव तयार करण्यात आला होता. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांचे भाविकांच्या संख्येचे प्रमाणपत्र, वनविभागाचे उपवनसंरक्षक यांचे नाहरकत पत्र यासह विविध विभागांच्या पत्रांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका-यांमार्फत सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. त्यास राज्य निकष समितीच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर ब वर्ग दर्जा देणेबाबतचा शासन निर्णय झाला आहे.
श्री जवळेश्वर देवस्थानला २० ऑगस्ट २०११ रोजी ‘ क ‘ वर्ग दर्जा प्राप्त झाला होता. त्यांनतर आता ब वर्ग दर्जा मिळाल्याने देवस्थानचे महत्व वाढले आहे. तत्कालिन पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी सन २०१६ ला पर्यटन विभागामार्फत १ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर केला होता. त्यातून रथयात्रामार्ग, सभामंडप, ध्यानमंदिर, रथयात्रामार्ग, मंदिर परिसराचे सुशोभीकरण, परिसरात पेवींग ब्लाॅक व व्यापारी संकुल अशी कामे झाली होती. त्यानंतर २०२३ मध्ये पर्यटन विभागामार्फत ५० लाखांच्या निधीतून भक्तनिवास उभारण्यात आले आहे.

श्री जवळेश्वर देवस्थान हे जामखेड तालुक्यातील सर्वात मोठे पुरातन मंदिर मानले जाते.याठिकाणी वर्षभरात विविध उत्सव साजरे होत असतात. आषाढी एकादशी ते गुरूपोर्णिमा यादरम्यान साजरी होणारी श्री जवळेश्वर रथयात्रा राज्यात प्रसिध्द आहे.




