जामखेड न्युज——–
विमान अपघात संशयास्पद, आमदार रोहित पवार यांचा बाँम्ब

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूवरून महाराष्ट्रात संशयाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघाताची टाईमलाईन पत्रकारांसमोर मांडत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

इस्रायलची मोसाद हेर संस्था ज्या पद्धतीने आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी हातखंडे वापरते तशा पद्धतीने अजितदादांचा घातपात केला गेला असा जाहीर आरोप रोहित पवार यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दादांचा दौरा अचानक का बदलला ? विमानाची वेळ का बदलली गेली? पायलट का बदलले? विमान उतरविण्यासाठी बारामती विमानतळा वरील २९ क्रमांकाची धावपट्टी सुरक्षित असतानाही ११ क्रमाकांच्या काहीशा धोकादायक धावपट्टीचा आग्रह का धरण्यात आला, या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. या प्रकरणाची चौकशी त्रयस्थ परदेशी तपास संस्थांकडून केली जावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

विदर्भातील नेत्यामुळे दादांना कारऐवजी विमानाने जावे लागले
दादा बारामतीसाठी कार ने निघणार होते. त्यांचा ताफाही तयार होता. पण एक नेता दादांना भेटायला येणार होता त्याला पोहोचायला उशीर झाला. पूर्व विदर्भातील एका नेत्याला फाईल क्लिअर करायची होती. त्यामुळे दादा थांबले होते. ती फाईल मंत्रालयात असल्याने ट्रॅफिकमुळे फाईल पोहोचायला उशीर झाला. त्यातही वेळ गेला. त्यामुळे दादा गाडीने जाऊ शकले नाहीत आणि त्यांनी ७.१३ वाजता विमान बुक केले. तो उशीर जाणीव पूर्वक केला गेला का? असाही सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
रोहित पवार यांनी अजितदादांसोबत घातपात झालेला असू शकतो, अशी शंका उपस्थित केली. कोणताही घातपात होऊ नये यासाठी अजित पवार किती काळजी घ्यायचे, याचे उदाहरण त्यांनी दिले आहे. अजितदादांनी शेवटच्या काळात प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणे बंद केले होते, असे त्यांनी सांगितले. “अजितदादा लढवय्या होते. त्यांना कोणी ब्लॅकमेल करू शकत नव्हतं. मी फक्त ते घेत असलेली काळजी सांगितली. प्लास्टिकच्या बाटलीत टॅम्परिंग होऊ शकत होतं. त्यात काही ना काही मिसळता येऊ शकतं. म्हणून दादा प्लास्टिक बाटली ऐवजी काचेच्या बाटलीत पाणी प्यायचे. ते स्वतचे काळजी घ्यायचे,” असे रोहित पवार यांनी सांगितले.

काकांचा अपघात कसा झाला? माहीत असणं गरजेचं
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेले दावे गंभीर स्वरुपाचे आहेत. हे दावे करताना खासदार शरद पवार यांच्याशी काही चर्चा झालेली आहे का? असे त्यांना विचारण्यात आले. यावर बोलताना “रोहित पवार काही गोष्टी मांडत असेल तर त्याला अफवा म्हणत नाहीत. ज्यांना कुणाला काही वाटतं ते वाटू द्या. ते चारपाच लोक वेगळे आहेत. त्यांचा पक्ष वेगळा आहे. आमच्यासाठी काका महत्त्वाचे आहेत. आमच्या काकाचा अपघात कसा झाला, याची उत्तरे आम्हाला माहिती पाहिजेत,” असी मागणी त्यांनी केली.



