सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज (शनिवार) महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. याबरोबरच सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ‘अजित दादा अमर रहे’ अशा घोषणा दिल्याचे पाहायला मिळाले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पूर्ण झाला.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवडीचा प्रस्ताव दिलीप वळसे-पाटील यांनी मांडला, तर छगन भुजबळ यांच्याकडून या प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आले.
कोण आहेत सुनेत्रा अजित पवार? सुनेत्रा पवार यांचा जन्म (१८ ऑक्टोबर १९६३) मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील आहे. धाराशिवचे नेते, माजी मंत्री आणि शरद पवारांचे जुने स्नेही पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत.
सुनेत्रा पवार यांना लहानपणापासूनच राजकारण आणि समाजकारणाचा वारसा मिळाला होता. १९८० मध्ये त्यांचे अजित पवार यांच्याशी लग्न झाले. अजित पवार राजकारणात सक्रिय झाल्यानंतरही सुनेत्रा पवार राजकारणापासून दूर होत्या. बारामतीमध्ये शेती आणि समाजकारणात त्यांचा सहभाग मात्र होता.
२०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवारी दिली. लोकसभेत पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. प्रफुल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक झाली.