जामखेड बसस्थानकात चालक वाहकाला मारहाण व धमकी प्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

0
1614

जामखेड न्युज——

जामखेड बसस्थानकात चालक वाहकाला मारहाण व धमकी प्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

जामखेड बसस्थानक परिसरात एसटी महामंडळाच्या चालक-वाहकावर मारहाण व धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बारामती आगारातील चालक-कम-वाहक शेख रफिक लतिफ (वय ४०, बेंच नं. ६०५०, रा. बालेपिर, ता. जि. बीड) यांनी याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी शेख रफिक लतिफ हे दि. ०४ जानेवारी २०२५ रोजी बारामती ते शेगाव (जि. बुलढाणा) या मार्गावरील एसटी बस क्रमांक MH 14 LX 6083 घेऊन प्रवास करत होते. सकाळी सुमारे १०.१५ वाजता सदर बस जामखेड बसस्थानकात आली असता प्रवासी उतरतानाच अंदाजे ३० वर्षे वयाचा एक अनोळखी इसम चालकाच्या मागील खिडकीतून बसमध्ये चढला.

याबाबत शेख रफिक यांनी त्याला खिडकीतून का चढलास, दरवाजातून येणे आवश्यक होते, असे समजावून सांगितले. मात्र याच कारणावरून त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या अनोळखी इसमाने (वय अंदाजे ३२) शिवीगाळ करत शेख रफिक यांना बसमधून खाली ओढले.

त्यानंतर दोघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच “बस पुढे घेऊन ये, नाहीतर पाहून घेऊ” अशी धमकी दिली.यावेळी बसचे चालक व उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. त्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. घटनेनंतर शेख रफिक यांनी ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे उपचार घेतले असून त्यानंतर जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मारहाण करणाऱ्या इसमांपैकी एकाचे नाव सागर (पूर्ण नाव माहिती नाही), रा. सदाफुले वस्ती, जामखेड असे असल्याचे समजते. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांनी तक्रारीच्या आधारे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.

जामखेड बसस्थानकात चालक व वाहक यांच्या स्वसंरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे तर सर्व सामान्य प्रवाशांचे संरक्षण राम भरोसे का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. लवकरात लवकर सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here