जामखेडमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्याविरोधात स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई
एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल १,६८,९६०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त
जामखेड परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे अशी गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली अवैध दारुची विक्री करणारे आरोपी विरुध्द कारवाई करत, १,६८,९६०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच स्थानिक पोलीसांच्या कामगिरीबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
सोमनाथ घार्गे – पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन कारवाई करणेबाबतआदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशाप्रमाणे पो. नि. किरणकुमार कबाडी, स्था. गु.शा. अहिल्यानगर यांनी दिनांक २८ /१२ /२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि / समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय, घोडके,शामसुंदर जाधव, चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करून जामखेड पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले.
वर नमुद पथक जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास जामखेड ते नान्नज जाणारे रोडवर चुंबळी गावाचे शिवारातील न्यु रशिका हॉटेल येथे इसम नामे तुषार जगताप हा देशी दारुची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने नमुद ठिकाणी जावुन छापा टाकुन एक इसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे तुषार विठ्ठल जगताप,वय – ३२ वर्षे, रा. शिवाजीनगर, जामखेड, ता. जामखेड असे असल्याचे सांगितले.
पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाची व त्या ठिकाणीची झडती घेता सदर ठिकाणी ४४सिलबंद देशी दारु बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये ४८ सिलबंद बाटल्या असा एकुण १,६८,९६०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपींविरुध्द पोना / १५६६ श्यामसुंदर अंकुश जाधव यांचे फिर्यादीवरुन जामखेड पोलीसठाणे गु.र.नं. ६८३ / २०२५ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.