जामखेड मध्ये खुन करणाऱ्या आरोपीने सासवड मध्ये ही केला खुन
ग्रामीण पोलीस गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे दुहेरी खुनाचा गुन्हा उघडकीस आला. गेल्या महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडला खून करून पुण्यात आलेल्या नीरज गोस्वामीने ९ डिसेंबरला सासवडमध्ये दुसरा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
सीसीटीव्ही, तांत्रिक तपासातून दोन्ही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. सासवड शहरातील न्यू आनंद वाईन्सच्या बाजूस बांधकाम साइटवर राजू दत्तात्रेय बोराडे (३८,रा. सासवड, ता. पुरंदर) याचा गळा चिरून क्रूर खून झाल्याचे उघड झाले.
सासवड पोलीस आणि गुन्हे शाखेने सीसीटीव्ही तपासले असता, दोन संशयित दिसले. कोंढवा, हडपसर सह विविध भागांत पथके रवाना केली.
आनंद वाईन्सला दारू घेण्यासाठी आलेल्या संशयिताला पकडले. चौकशीत त्याने सूरज प्रकाश बलराम निषाद हेनाव सांगितले. कबुलीत निषादने साथीदार नीरज गोस्वामी सह बोराडे याचा दारूच्या नशेत वादातून खून केल्याची कबुली दिली.
गोस्वामीने जामखेडला पैशांच्या वादातून विकास मधुकर अंधारे (२२) याचा खून केल्याचेही सांगितले. पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय अविनाश शिळीमकर, कुमार कदम, सहाय्यक निरीक्षक वैभव सोनवणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.