जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीने खरीप वाया रब्बी हंगामही धोक्यात
जामखेड शहर व तालुक्यात सतत सहा महिने पाऊस पडला व अजुनही पडत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तसेच ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नगदी असलेले खरीप पिके उडीद व सोयाबीन वाया गेली. अतिवृष्टीची सरकार कडून मिळणारी नुकसानभरपाई उशीरा मिळाली, हमीभाव खरेदी केंद्र चालू न झाल्यामुळे थोडेफार हाती लागलेले उडीद व सोयाबीन कवडीमोल दराने व्यापा-यांनी खरेदी केली. चांगल्या पावसामुळे रब्बीचा हंगाम साधेल अशी शक्यता होती.
मे ते आँक्टोबर सलग सहा महिने पाऊस पडला नोव्हेंबर सुरू झाला तरीही पाऊस येतच आहे. पावसाची सरासरी ५७६ मि. मि असताना तो ११९४ मि. मी. इतका सरासरीपेक्षा दुप्पट पडला व पाऊस अजुनही थांबायचे नाव घेईना व वापसा होईना त्यामुळे रब्बी हंगामासाठी मशागतीचे कामे होईना यामुळे शेतकरी रब्बी हंगाम संकटात आला असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.
तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारी पिक महत्त्वाचे असते ज्वारी पिकासाठी कोरडे हवामान आवश्यक असते पण सततच्या पावसामुळे कोवळी पीके सडून जाण्याच्या मार्गावर आहेत.
जामखेड शहर व तालुक्यात यावर्षी मे महिन्याच्या मध्यापासून कडक उन्हाळ्यातच सलग १३ दिवस मुसळधार पाऊस पडला यामुळे ओढे, नदीनाले भरभरू वाहीले. तब्बल २९३ मि. मी. पाऊस पडला पावसाळ्यात पडणा-या ५७६ मि. मी. च्या सरासरीच्या अर्ध्यापेक्षा जास्त पाऊस पडला यामुळे जुन महिन्यातील खरीप हंगाम वेळेत सुरू झाला. नगदी पिके असलेले उडीद व सोयाबीनची तब्बल ४५ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. पेरणी नंतर उगवलेल्या पिकाला पावसाची आवश्यकता असताना पावसाने ओढ दिली.
जुन महिन्यात अवघा ५९ मि. मी. पाऊस पडला. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. तसेच जुलै महिन्यात अधुनमधून पाऊस पडला तो ९२ मि. मी. पडला. त्यामुळे खरीप वाया जाणार अशी शक्यता असताना आँगस्ट महिन्यात २०७ मि. मी. पाऊस पडला.
यामुळे खरीप पिकांना संजीवनी मिळाली व खरीप हंगाम साधेल अशी आशा असताना सप्टेंबर महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला. ४६५ मि. मी. इतका पाऊस झाला. जेकाढणीला आलेले खरीप पिके पूर्ण पणे भिजली तसेच अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले तर काढलेली पिके वाहून गेली तसेच पिके महिनाभर पाण्यात राहीले यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास वाया गेला.
अतिवृष्टीमुळे तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर पुर आले काही ठिकाणी शेतजमीन खरडून वाहून गेली. पिके पाण्यात असल्याने काढता आली नाही. सरकारने सरसकट नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली पण दिवाळीत ती न मिळाल्या मुळे जे काही थोडेफार उडीद व सोयाबीन निघाले ते व्यापा-यांनी कवडीमोल दराने विकत घेतले व कशीबशी दिवाळी शेतकऱ्यांनी साजरी केली. पडलेल्या पावसाने रब्बी हंगाम चांगला होईल अशी असताना आँक्टोबर महिना संपला तरी पाऊस थांबेना. नोव्हेंबर महिन्यातही पाऊस धो धो पडतो. त्यामुळे शेतजमिनी चिभाडल्या असून वापसा महिनाभर होऊ शकत नाही व त्यामुळे मशागत होईना. हिवाळ्यातील दुसरा महिना सुरू झाला आहे पण पाऊस थांबायला तयार नाही. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.
ऊस उत्पादक संकटात ——————————– जामखेड तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला आहे व अजूनही पाऊस थांबेना कारखान्याचे धुराडे पेटले आहे. ऊस तोडणीसाठी कामगारांना सूरक्षितता नाही. चिखलामुळे ऊसतोड होईना व तोडला तरी वाहतूक करता येईना. तसेच अनेक ठिकाणी बांधरस्ता नसल्याने ऊस वाहतूक कशी करायची या दुहेरी संकटात ऊस उत्पादक शेतकरी सापडला आहे.