जामखेड न्युज – – –
बैलगाडा शर्यती सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके मैदानात उतरले आहेत. त्यांनी पशुसंवर्धन राज्यमंत्री सुनील केदार यांना भेटून यासंदर्भातील निवेदन दिलं. राज्य सरकारने पुढाकार घेऊन सर्वोच्च न्यायालयात वकील आणि संघटनांची बैठक लावून मार्ग काढला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
बैलगाडा शर्यत आपुलकीचा विषय
बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा आपुलकीचा विषय आहे. बैलगाडा शर्यती संदर्भात राज्य शासनाने केलेल्या कायदा, विरोधातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेची सुनावणी तात्काळ घेण्यात येऊन शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी, यासाठी पशुसंवर्धन केदार यांच्याकडे लंके यांनी मागणी केली.
वकील आणि संघटनांची बैठक लावा
पाचशे वर्षांपासून बैलगाडा शर्यत सुरू आहे; मात्र 2017 पासून बंदी आली. या निर्णयाविरोधात अनेक संघटना आंदोलन करत आहेत. बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी अनेक संघटना प्रयत्नशील आहेत. तमीळनाडू आणि कर्नाटक राज्यामध्ये बैलगाडा शर्यत सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुढाकार घेऊन सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि संघटनांची बैठक लावून मार्ग काढला पाहिजे, अशी मागणी लंके यांनी केली आहे.
आमचा सर्वांचा लढा
जी सुनावणी प्रलंबित आहे, ती तात्काळ घेण्यात येऊन शर्यती पुन्हा सुरु करण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी. लवकरात लवकर बैलगाडा शर्यत सुरू झाली पाहिजे. यासाठी आमचा सर्वांचा लढा सुरू आहे, असं नीलेश लंके यांनी या वेळी सांगितलं.
बैलगाडा शर्यतीसाठी नगरमध्ये आंदोलन
बैलगाडा शर्यत सुरू करा अशी मागणी करत राहुरी येथे नगर मनमाड महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले होते. ‘पेटा हटवा , बैल वाचवा’ असा नारा या वेळी आंदोलकांनी दिला. घोडा, बैलांसह शेतकरी ‘रास्ता रोको’ आंदोलनात मोठ्या संख्येने सामील झाले होते. अहमदनगर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी राहुरी बाजार समितीसमोर एक तास ‘रास्ता रोको’ करत महामार्ग अडवून धरला. या ‘रास्ता रोको’मुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.