सभापती प्रा. राम शिंदेंच्या बंगल्याभोवती गुडघाभर पाणी, नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
सीना व तिच्या उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस पडत असल्याने रविवारी पुन्हा एकदा सीना नदीला महापुर आला. सीना नदीच्या महापुराने सर्व रेकॉर्ड ब्रेक करत रौद्ररूप धारण केले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या चोंडी गावाला सीना नदीच्या महापुराचा वेढा पडला आहे. शिंदे यांच्या बंगल्याभोवती गुडघाभर पाणी आहे. चोंडीला चोहोबाजुने महापुराचा वेढा पडला आहे. अनेक घरात पाणी शिरले आहे. पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.चोंडीत सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहेत. महापुराने हाहाकार उडवला आहे.
शनिवारी रात्री सीना व तिच्या उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात तुफान अतिवृष्टी झाली. यामुळे सिना नदीला ऐतिहासिक महापुर आला. मागील पंधरा दिवसांत दोनदा आलेल्या महापुरापेक्षा आजचा महापुर मोठा विध्वंस घडवणारा ठरू लागला आहे. चोंडीला महापुराने वेढा दिला आहे. या महापुराचा मोठा फटका चोंडी गावाला बसला आहे. गावातील अनेक भागात पाणी शिरले आहे. देवकरवाडी पाण्याखाली गेली आहे.
रविवारी सकाळी चोंडीचा पुल पाण्याखाली गेला. या पुलावरून सीना नदी प्रचंड वेगाने वाहत आहे. दुपारी 1 वाजेपासून चोंडी गावातील हेलीपॅड परिसर, तलाठी कार्यालय, विश्रामगृह परिसर,शाळेची मागील बाजू, त्याचबरोबर शिल्पसृष्टीतील गार्डन, सभागृह परिसराला पाण्याचा वेढा पडण्यास सुरुवात झाली होती. दोनच्या सुमारास विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या बंगल्याजवळ पाणी आले होते. त्यानंतर चार वाजता शिंदे यांच्या बंगल्यासमोरून गुडघाभर पाणी वाहत होते. संपुर्ण चोंडी जलमय झाली आहे. शाळा, दुकाने पाण्याखाली गेले आहेत.
चोंडी – हळगाव रस्त्यावरील ओढ्यात सीना नदिच्या महापुराचा फुगवटा आल्याने या पुलावर डोक्या इतके पाणी होते. महापुरामुळे ओढ्याचे पाणी तुंबून झोपडपट्टीतील अनेक घरात घुसले. चोंडीत महापुराने मोठा विध्वंस घडवला आहे.
सीना नदीला आलेल्या महापुराचा फटका नगर शहरालाही बसला आहे. सीना नदीच्या पाणलोटात तुफान अतिवृष्टी झाल्यामुळे सिना नदीला महाप्रचंड असा महापुर आलाय.. गेल्या पंधरा दिवसांतील हा तिसरा महापुर आहे. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये प्रचंड नुकसान झालेय. या भागातील शेती अक्षरशा: खरडून गेलीय.. नदीवरील बंधारे उध्वस्त झाले आहेत. सीना नदीच्या प्रकोपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चोंडीतही सीना नदीच्या महापुराने हाहाकार उडवून दिला आहे. नागरिकांनी सुरक्षित आणि सतर्क रहावे असे अवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, नगर, आष्टी, पाथर्डी तसेच विंचरणा नदीच्या खोऱ्यात रविवारी सायंकाळी पुन्हा अतिवृष्टी झाल्यास चोंडीसह अनेक गावांवर मोठं संकट कोसळण्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजता सीना धरणातून २६ हजार ७०५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे सिना नदी विक्राळ रूप घेऊन वाहत आहे. सीना नदी विनाशकारी ठरू लागली आहे. सीनाकाठावरील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कचे अवाहन केले आहे.