आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी
धरण फुटलं, बंधारे वाहून गेले, शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान
कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी व मुसळधार पावसाने शेतकरी आणि सामान्य नागरिकांची अक्षरशः वाट लागली आहे. शेतातील उभ्या पिकांचं पाणी वाहून गेलंय, माती खरवडून गेलीय, धान्य व घरातील वस्तू चिखलात पुरल्या आहेत. रस्ते, पूल, बंधारे व वीजेच्या सुविधा कोसळून नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे.
या भीषण परिस्थितीत आमदार रोहित पवार यांनी संवेदनशील पद्धतीने प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली. सोनेगाव येथील बंधारा, शेतातील पिकं, पुलाचा वाहून गेलेला भराव आदी नुकसानीसह वंजारवाडी, तरडगाव, खर्डा, जायभायवाडी (ता. जामखेड), सितपूर, नागापूर, नागलवाडी, निंबोडी, मलठण (ता. कर्जत) आदी भागांत ते ग्रामस्थांना धीर देण्यासाठी पोहोचले.
शेतकरी सध्या हतबल अवस्थेत आहे, त्याला या संकटातून सावरण्यासाठी धीर देणं आवश्यक आहे, हे अधोरेखित करत रोहित पवारांनी प्रत्यक्ष बळीराजाशी संवाद साधून त्याचा आत्मविश्वास उंचावला.
संकटात मदतीचा हात
अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्याने घरात शिरलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आमदार पवारांच्या कार्यकर्त्यांमार्फत किराणा साहित्याचं वाटप करण्यात आलं. “हा अडचणीचा काळ आहे. ज्यांच्या घरात पाणी घुसलं, ज्यांचं नुकसान झालं त्या प्रत्येक कुटुंबाला शक्य ते सहकार्य करा,” असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.
वीज खंडित – रस्ते उद्ध्वस्त
जवळके, बावी, बोर्ला, जवळा आदी गावांत वीजेचे पोल कोसळून वीजपुरवठा खंडित झाला असून, रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले आहेत. या संदर्भात प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने दुरुस्तीचे आदेश आमदार पवारांनी दिले आहेत.
सरकारला जाब
“मायबाप सरकार, बघताय ना…? जगाचं पोट भरणारा बळीराजा आज जगायचं कसं? तो लाचार नाही, स्वाभिमानी आहे… पण निसर्ग कोपल्याने त्याचं सर्वस्व वाहून गेलंय, स्वप्नांचा चिखल झालाय! त्यामुळे संवेदनशीलता दाखवून तातडीने कर्जमाफी करा आणि उपकार केल्यासारखे ७ हजार न देता, हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करा,” अशी ठाम मागणी आमदार पवारांनी केली.
संघर्ष पाचवीलाच पूजलेला
राजुरी, धनेगाव, बांधखडक आदी गावांत भेटीदरम्यान पिकं वाहून जाणं, माती खरवडणं, घरातील धान्य-भांडी व वस्तूंचा चिखल होणं या दुर्दैवी दृश्यांनी प्रत्येकाचं मन विषण्ण झालं. तरीही आमदार पवारांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितलं – “नुकसान आर्थिक मदतीने भरून निघणारं नाही… पण बळीराजाच्या पाचवीलाच संघर्ष पूजलाय. तरीही चांगले दिवस आणण्याच्या आशेने आपण सर्वजण एकत्र लढत राहू.”