जामखेड शहरातील यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
जामखेड शहरातील नागपंचमी यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जामखेड शहरात 29 जुलै पासून नागपंचमी निमित्त होणाऱ्या नागेश्वर यात्रा उत्सवाचा सर्वच नागरिकांनी आनंद घ्यावा व यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केले.
आज शुक्रवार दि. 25 जुलै रोजी नागपंचमी यात्रेच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने जामखेड पोलीस स्टेशन येथे पत्रकारांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी म्हणाले की, दि. 29 जुलै पासून जामखेड शहरात नागपंचमी निमित्त नागेश्वर यात्रा उत्सवास सुरूवात होणार आहे.
हा यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी 7 पोलीस अधिकारी व 80 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. या यात्रेचा सर्व नागरिकांनी आनंद घ्यावा. यात्रे दरम्यान कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी योग्य त्या ठिकाणी पार्किंग करावेत व वाहतूक नियमांचे पालन करावे.
यात्रेमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आढळून आल्यास त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कुस्ती हंगामा, नर्तकींचे कार्यक्रम, आनंदनगरी, पालखी सोहळा या ठिकाणी देखील बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
यात्रा उत्सवा दरम्यान कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी शहरात व यात्रा उत्सव ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तरी यात्रा उत्सवादरम्यान सर्व नियमांचे पालन करून यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले.