दहा हजाराची लाच घेताना राहुरीचे गटविकास अधिकारी रंगेहाथ पकडले
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज(शुक्रवारी) केलेल्या यशस्वी कारवाईत राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे (वय ५७) यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एका सेवानिवृत्त ग्रामसेवका कडून त्यांच्या बाजूने अहवाल पाठवण्यासाठी मुंडे यांनी ही लाच मागितली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत. राहुरीच्या गटविकासअधिकाऱ्यांच्या अहवालानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
तक्रारदार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्यावरील दोषारोप पत्राचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठवणे अपेक्षित होते. हा अहवाल तक्रारदारांच्या बाजूने पाठवण्यासाठी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी स्वतः दहा हजार रुपयांची लाच मागितली आणि आज (२० जून) ती स्वीकारली.
तक्रारदाराच्या तक्रारीनंतर अ.नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षक छाया देवरेपरवेक्षन अधिकारी अजित त्रिपुटे, यांच्या नेतृत्वाखालील पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, आणि ड्रायव्हर अरुण शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
लाचेची रक्कम स्वीकारताच मुंडे यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून लाचेची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.
या प्रकरणी गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे(नेमणूक पंचायत समिती राहुरी, रा. प्लॉट नंबर 68,69 केशवकुंज रोड, श्रीराम चौक, ऐश्वर्या नगरीअहिल्यानगर) यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनीसर्व नागरीकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.@ टोल फ्रि क्रं. 1064