जामखेड न्युज – – – –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुर्चीवरून उठून उभे राहिले. त्यांनी विनम्रपणे हात जोडले, नमस्कार केला…….. हे घडले कुठे? सांगलीत, जिल्हाधिकारी कार्यालयात. ते कुणासाठी उठले, कोण होते ते लोक? का होते आहे, त्यांच्या या फोटोची एवढी चर्चा… मी आज विश्वनाथ मिरजकर यांना भेटलो,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्यांना हात जोडले तेच हे विश्वनाथ मिरजकर. त्यांची आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट मिरजकर त्यांना निवेदन द्यायला गेले होते. त्यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी खुर्चीवर बसलेल्या मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना मिरजकर हे ज्येष्ठ शिक्षक व शिक्षक चळवळीचे नेते असल्याची ओळख करून दिली. आपल्या समोर एक ज्येष्ठ शिक्षक उभा आहे, हे लक्षात येताच श्री. ठाकरे खुर्चीतून उठले आणि त्यांनी विनम्रपणे हात जोडले. प्रश्न समजून घेतले.
विश्वनाथ मिरजकर सांगत होते, आम्ही अनेकदा जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने दिली. त्यांनी ती खुर्चीत बसूनच हाती घेतली. आम्ही उभे असायचो, फोटो काढायचो. परवा मात्र धक्का बसला. मुख्यमंत्री उठून उभे राहिले आणि उभे राहून त्यांनी आमचे निवेदन घेतले. गुरुजणांप्रतीची ही विनम्रता मनाला स्पर्श करून गेली. राजकीय नेत्यांनी सामान्य माणसाला भरभरून पैसे, निधी, मदतच द्यायला हवी, असे प्रत्येकवेळी नसते. थोडाशा सन्मानानेही सामान्य माणूस भारावून जातो. हा सन्मान दीर्घकाळ स्मरणात राहतो. श्री. मिरजकर यांच्यासोबत आज पाच-पन्नास शिक्षक होते. एकमेकांना तो फोटो शेअर करत होते. शिक्षकांचे प्रश्न कालही होते, आजही आहेत, उद्याही असतील… कुठल्याच घटकाचा प्रश्न कधीच शंभर टक्के संपत नसतो. तो हाताळताना जबाबदार घटक ज्याचा प्रश्न आहे, त्याच्याविषयी किती आत्मीयता दाखवतात, हा खरा मुद्दा असतो.