महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर… संजय राऊतांचा राज्यपालांना इशारा

0
228
जामखेड न्युज – – – 
राज्यपालांनी सरकारची अडवणूक करु नये. हा राजकीय दबावाचाच एक प्रकार असतो. राजभवन हे सरकारला मदत करण्यासाठी असतं, पाय खेचण्यासाठी नसतं. पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर तुमचाच पाय गुंत्यात अडकून पडाल अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केलाआहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“राज्यपालांनी लोकनियुक्त सरकार ज्याने घटनेनुसार शपथ घेतली आहे त्यांची राजकीय कारणासाठी अडवणूक करु नये. मग ते विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्त्या असतील किंवा एमपीएमसीसंबंधी नियुक्त्या असतील. हा राजकीय दबावाचाच एक प्रकार असतो. त्यांचे बोलवते धनी कोणी इतर असतं. राज्यपालांनी अशा वादात पडू नये. पण महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये सातत्याने हे दिसत आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“राजभवन हे सरकारला मदत करण्यासाठी असतं. पाय खेचण्यासाठी नसतं. पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर तुमचाच पाय गुंत्यात अडकून पडाल,” असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, “राज्यपालांना कोणी हस्तक्षेप करायला लावत आहे का हे पहावं लागेल. जी कामं मंत्रिमंडळाची, मुख्यमंत्र्यांची आहेत त्यात घुसण्याचा प्रयत्न होत असल्याचं नवाब मलिकांनी सांगितलेलं मी ऐकलं. हे घटनाविरोधी आहे. राज्यपालांना कामाचा आढावा घेण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी गाव स्तरावर दौरे काढण्याची गरज नाही. इतर राज्यांमध्येही पूर आले आहेत. पण भाजपाशासित इतर राज्यांमध्ये राज्यपाल दौरे काढताना दिसत नाहीत. हे पाहिल्यानंतर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील राज्यपाल असं का वागत आहेत हे समजेल किंवा असं वागण्यास का प्रवृत्त केलं जात आहे”.
“राज्यपालांचं काम मर्यादित स्वरुपातील आहे. त्यांनी कॅबिनेटच्या शिफारसी, निर्णयांचं पालन करावं तसंच सरकारच्या कामात हस्तक्षेप करु नये असं घटनेत आहे. त्यांनी हे नियम पाळलं तर बरं पडेल,” अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here