आईच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने काही तासातच मुलाचाही मृत्यू
जामखेड तालुक्यातील घटना
जामखेड तालुक्यातील शिवपट्टन खर्डा येथे आईच्या निधनानंतर आईचा अंत्यविधी करून घरी येताच मुलाच्या छातीत दुखू लागल्याने ताबडतोब खाजगी दवाखान्यात दाखल केले पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आईच्या जाण्याचा विरह सहन न झाल्याने मुलाचा देखील मृत्यू झाला आहे. ही मनाला चटका लावणारी घटना घडल्या मुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
खर्डा परिसरात किशोर दत्तात्रय तंटक (६०) हे स्टेशनरी दुकान गावोगावी बाजारात मांडत होते. यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. आई इंदुबाई दत्तात्रय तंटक वय ९० यांचे सोमवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले याचा मुलांवर मोठा मानसिक परिणाम झाला आणि मुलगा किशोर दत्तात्रय तंटक यांचेही काही तासातच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
आईमुळे आपल्याला जीवनाला अर्थ प्राप्त होतो. ती आपल्याला जन्म तर देतेस पण आयुष्यभर पुरेल अशी संस्काराची शिदोरी देते. आई म्हणजे अपार काळजी करणारे मन, प्रेमाने घास भरणारी ती आई वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहील पण आपल्या कुटुंबाला व मुलांना उपाशी ठेवत नाही. स्वतःसाठी न जगता कुटुंबासाठी झिजणारे व्यक्तिमत्व म्हणजे आई. मुलाच्या हजार चुका माफ करणारे मन म्हणजे आई अथांग सागरा एवढेप्रेम आई शिवाय दुसरी कोणीच करू शकत नाही. अशी आईची माहती सांगता येईल. त्यामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारी आईच जर आपल्याला सोडून गेली तर काय अवस्था होते. ती शब्दात सांगणे कठीण आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जामखेड तालुक्यातील खर्डा सोमवारी (दि. १६) रात्री उशिरा इंदुबाई दत्तात्रय तंटक (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र आईचा अंत्यविधी करून घरी येताच आईच्या विरहाने त्यांचा मुलगा किशोर दत्तात्रय तंटक याने देखील प्राण सोडल्याची घटना घडली.
इंदुबाई यांचा अंत्यविधी मंगळवारी खर्डा येथे करण्यात आला. त्यांचा अंत्यविधी उरकून घरी आल्यानंतर त्यांचा मुलगा किशोर दत्तात्रय तंटक यांच्या छातीत दुखू लागले. आईच्या जाण्याने हृदयविकाराचा झटका येऊन किशोर यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.