जामखेड न्युज——
जामखेडमध्ये गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या

गणपती बाप्पाला आपआपल्या घरी नेण्याची तयारी आज गणेश चतुर्थीनिमित्त दिसत आहे.जामखेडच्या बाजारपेठामध्ये आज बाप्पाला दाखवायच्या नैवेद्याची तयारी करण्यासाठी 21 भाजाची खरेदी सुरु झालेली आहे. या भाज्या मोसमात येत असतात. गणेश मूर्ती खरेदी, सजावट साहित्य व नैवेद्य साठी भाज्या खरेदीची बाजारपेठेत लगबग दिसत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी जाणवत आहे.

जामखेडमध्ये बाजारपेठा आज बाप्पाच्या आगमनाच्या तयारीने गजबजलेल्या दिसत आहेत. यंदा बाप्पाच्या मूर्तीपासून ते सजावटीच्या साहित्यात 25 ते 30 टक्के दरवाढ झालेली आहे. तरीही बाप्पाच्या आगमनासाठी लोकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. पुढील दहा दिवस आता महाराष्ट्रासह इतर राज्यातही आरत्यांचा आवाज दुमदुमणार आहे.

सर्वांच्याच लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन आज शनिवारी आगमन होत असून, बाप्पांच्या स्वागतासाठी लागणार्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. दोन दिवसांपासून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.

प्लास्टिक फुलांच्या माळांना गणेशभक्तांनी पसंती दिली आहे. यात रंगीबेरंगी कृत्रिम फुलांच्या माळांची अनेकांना भुरळ पडत असून, यंदा मखरांकडे गणेशभक्तांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. गणपतीच्या हटके मखराचे पर्याय शोधणार्या गणेश भक्तांचे लक्ष या कृत्रिम फुलांकडे आकर्षित होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सजावट करताना इको फ्रेंडली मखराला प्राधान्य द्यावे, सण झाल्यावर त्याचे पावित्र्यही जपणे गरजेचे असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

विघ्नहर्त्या गणरायांचे आज शनिवारी आगमन होत आहे. त्यामुळे समस्त भाविक लाडक्या बाप्पांच्या स्वागताला लागले आहेत. सजावटीसाठी लागणार्या साहित्याच्या खरेदीसाठी जयहिंद चौक, जुनी पंचायत समिती कार्यालय समोर, बाजारतळ, मार्केट समोर संविधान चौक सह अनेक ठिकाणे गर्दीने फुलून गेले आहेत.

गणरायाची आरास करण्यासाठी आकर्षक सजावटीच्या दिव्यांच्या माळादेखील बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक पणत्या, समई, तरंगते दिवेदेखील उपलब्ध आहेत.विद्युत रोषणाईसाठी विविध आकर्षक विद्युत दिव्यांच्या माळा बाजारपेठेतील दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांची वर्दळ सुरू आहे. एलईडी इंडियन, एलईडी माळा, डमरू माळ, चेरीलाइट अशा माळाही उपलब्ध आहेत. यंदा नव्याने आलेल्या लाइटच्या ट्री, फाउंटन आणि वेल लाइट या प्रकारांना ग्राहकांकडून विशेष मागणी आहे.









