पिंपळवाडीचा पाणीप्रश्न आज न सुटल्यास उद्या तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढणार – युवक क्रांती दल

0
612

जामखेड न्युज——

पिंपळवाडीचा पाणीप्रश्न आज न सुटल्यास उद्या तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढणार – युवक क्रांती दल

 

पिंपळवाडीतील पाणी प्रश्नाबाबत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी बैठक बोलावली होती.
या बैठकीत पाणीपुरवठा बाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या. आज जर पाणीप्रश्न सुटला नाही तर उद्या तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा युवक क्रांती दल यांनी दिला आहे.

साकत ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिंपळवाडी गावामध्ये गेल्या दहा वर्षांपासून सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. अर्ज, निवेदने आणि तक्रारी दिल्या की तेवढ्यापुरतचं पाच ते दहा घरांना पाणीपुरवठा केला जातो व पुन्हा पाणीपुरवठा बंद केला जातो. हजारो कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या मात्र एक थेंबही गावातील नागरिकांना पाहायला मिळाला नाही.


यंदा पुन्हा पाण्याच्या समस्येने डोके वर काढले असून गावातील नागरिकांना व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे पिंपळवाडी येथील ग्रामस्थांनी १८ एप्रिल रोजी तहसील कार्यालयावर हंडामोर्चा काढण्याबाबत तहसील प्रशासनाला ४ एप्रिल रोजी निवेदनाद्वारे इशारा दिला होता.


तसेच गावातील सिमेंट रस्ता व ब्लॉक बसविलेल्या प्रांगणाची नादुरुस्ती याही प्रश्नांंचा निवेदनामध्ये समावेश होता. निवेदनाची दखल घेत आज १६ एप्रिल रोजी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी पंचायत समिती कार्यालयात बैठक बोलावली.

बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुण जाधव, युवक क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष विशाल नेमाने, उपाध्यक्ष विजय घोलप, ज्येष्ठ समाजसेवक लक्ष्मण घोलप, बबन नेमाने व पिंपळवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बीडीओ पोळ यांनी पिंपळवाडीतील पाणी प्रश्नांवर चर्चा केली व संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा व समस्या सोडविण्याबाबत सूचना दिल्या.

तसेच ही समस्या लवकरात लवकर सोडवली जाईल असे आश्वासन दिले. त्यानुसार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माने यांनी साकत ग्रामपंचायतचे ग्रामसेवक वळेकर यांना सोबतीला घेऊन १६ एप्रिल रोजी गावातील पाणी प्रश्न, सिमेंट ब्लॉक नादुरुस्ती व सिमेंट काँक्रिट रस्ता नादुरुस्तीचा पंचनामा केला. यावेळी नागरिकांनी ग्रामसेवक वळेकर यांना चांगले धारेवर धरले. तसेच पाणी प्रश्नासह इतर समस्या लवकरात लवकर सोडवल्या नाही तर १८ एप्रिल रोजीचा नियोजित असलेला हंडामोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात येणार असल्याचे, पिंपळवाडीतील ग्रामस्थ व ज्येष्ठ समाजसेवक लक्ष्मण घोलप यांनी सांगितले आहे.

चौकट

कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात येतात मात्र ग्रामस्थांना पाणी मिळत नाही नेमके कोट्यावधी रूपये जातात कोठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत गावच्या पाणीपुरवठ्यासाठी किती खर्च झाला लोकांना पाणी किती मिळाले याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here