जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघाला पाणीदार बनवण्यासाठी अनेक योजना प्रभावीपणे राबवत आहेत.दुष्काळी गावांची टँकरमुक्तीकडे वाटचाल व्हावी तसेच पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न सुटावा म्हणुन प्रयत्नशील आहेत.मतदार संघातील सिंचन विहिरींच्या खोदाईसाठी येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी आ.रोहित पवारांनी भूजल सर्वेक्षण विकास व यंत्रणा विभाग महाराष्ट्र राज्याचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची नुकतीच भेट घेतली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना २०२०-२१ अंतर्गत कर्जत-जामखेड मतदारसंघात सिंचन विहिरी खोदाईसाठी अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले.भूजल सर्वेक्षण विभागाने कर्जत व जामखेड मतदारसंघांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार व सिंचन विहिरी घेणेबाबत बदललेल्या कार्यपद्धतीमुळे मतदार संघातील खुप कमी गावेच सिंचन विहिर योजनांसाठी पात्र होती. त्यामुळे उर्वरित इतर गावातील लाभार्थी सिंचन विहिर खोदाई योजनांपासून वंचित राहिले होते.आ.पवार यांनी याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक कलशेट्टी यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवून पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला यशही आले आहे.आ.पवार व कलशेट्टी यांच्या समक्ष झालेल्या चर्चेत सिंचन विहिरी खोदण्याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाकडून अवलंबिण्यात येत असलेली कार्यपद्धती काही अंशी बदलण्यात येत असल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघातील तसेच नगर जिल्ह्यातील इतर अतिरिक्त गावांचाही समावेश या योजनेमध्ये होत आहे.त्यामुळे आता या उर्वरित गावांतील लाभार्थ्यांनाही सिंचन विहिरी खोदाईच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. कर्जत तालुक्यातील एकूण ६२ गावे व जामखेड तालुक्यातील ८७ गावे या योजनांसाठी पात्र असणार आहेत.या भेटीत कर्जत तालुक्यातील ‘अटल जल योजनेत’ समाविष्ट गावांमध्ये योजना लवकरात लवकर सुरू करावी व यामध्ये जामखेडमधील गावांचाही समावेश करावा ही चर्चाही करण्यात आली.त्यामुळे कर्जत-जामखेड आणि नगर जिल्ह्यातील दुष्काळी असलेल्या गावांना आता सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही.शेतकऱ्यांकडून आ.रोहित पवारांचे कौतुक होत आहे.
चौकट:
______________________________ _
*आ.रोहित पवारांच्या एकाच दगडात अनेक पक्षी!*
आ.रोहित पवार हे मतदारसंघातील महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न पाठपुरावा करून सोडवत असताना त्याचा फायदा मतदार संघाबरोबरच जिल्ह्यालाही होतो.पीकविमा,बियाणे तसेच अन्यप्रश्नांसोबत आता सिंचन विहिरी खोदाईचा जिल्ह्यातीलही प्रश्न मार्गी लागत आहे.याबाबत नवीन आदेश संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना लवकरच देण्यात येणार आहेत
आ.पवारांचे काम मतदारसंघापुरते सिमित न राहता ते अनेकांच्या कामी येते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.