जामखेड मध्ये 13500 कुणबी नोंदी

0
1031

जामखेड न्युज——

जामखेड मध्ये 13500 कुणबी नोंदी

 

मराठा साम्राज्याच्या आरक्षणासाठी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांच्या अंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात दस्तऐवज तपासणी मोहीम सुरू आहे. जामखेड तहसील कार्यालयाकडून कुणबी दस्तावेजांची तपासणी करण्यात येत असून कुणबी नोंदी शोधण्यासाठी आतापर्यंत ७ लाख ६० हजार दस्तावेज तपासण्यात आले असून, त्यामध्ये १३५०० कुणबी नोंदी सापडल्या आहेत.

अद्याप अडीच लाख दस्तावेजांची तपासणी सुरू आहे. हे काम येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.


जामखेड महसूल विभागामार्फत १० नोव्हेंबरपासून कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. तहसीलमधील जुने रेकॉर्डमधील हक्कपत्रक आणि जन्म-मृत्यू रजिस्टर या जुन्या दस्तावेजांचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी तहसील कार्यालयीन कर्मचारी, तलाठी आणि कोतवाल यांनी एकत्रित शोध मोहीम राबवल्याने कमी कालावधीत जास्त दस्तावेज तपासले.

यानुसार १९१३ पूर्वीचे तीन लाख साठ हजार जुने दस्तावेज हे मोडी लिपीत असल्याने, त्याचे लिप्यांतर करण्याचे काम चालू आहे. मोडी भाषेतील जुने दस्तावेज तपासण्यासाठी मोडी अभ्यासक संतोष यादव हे जबाबदारी पार पाडत आहेत.


जामखेड तालुक्यात तहसील कार्यालयामार्फत मराठी भाषेतील सर्व साडेचार लाख जुने दस्तावेज तपासण्यात आले असून, त्यामध्ये ९ हजार ७०० कुणबी नोंदी आढलल्या आहेत, तर मोडी लिपीचे एक लाख दहा हजार दस्तावेज तपासण्यात आले असून, त्यामध्ये साडेतीन हजार कुणबी नोंदी आढळल्या आहेत. मोडी लिपीचे अद्याप अडीच लाख दस्तावेज तपासण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये दोन लाख जुने शाळा सोडल्याचे दाखले तपासण्यात आले.

सन १९१३ पूर्वीचे मोडी लिपीचे शाळा सोडल्याचे दाखले तपासण्याचे काम चालू आहे. दरम्यान, कुणबी नोंदी शोधण्यासाठी भूमी अभिलेख, पोलिस विभाग व जेल विभागातीलही जुने दस्तावेज तपासण्यात आले. मात्र, या ठिकाणी कुणबी नोंदी आढळून आल्या नाहीत. अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

जामखेडचे सुपुत्र मूळचे डोणगावचे असलेले व सध्या नगर येथील वस्तुसंग्रहालयात अभिरक्षक असलेले संतोष यादव या दस्तावेजांचे वाचन करत आहेत.

चौकट
जिल्ह्यातील सर्व अभिलेखांमध्ये सर्वांत चांगले रेकॉर्ड हे जामखेड तहसील कार्यालयाचे आहे. त्यामुळे सर्वाधिक कुणबी नोंदी जामखेड तालुक्यात सापडण्याची शक्यता आहे. मोडी लिप्यांतर करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

– संतोष यादव, अभिरक्षक, अहमदनगर जिल्हा वस्तुसंग्रहालय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here