जामखेड न्युज ——-
चौंडीत राम शिंदे – नीलेश लंके यांचा ‘राजकीय’ फराळ

यंदा दिवाळीच्या निमित्ताने नगर उत्तर आणि नगर दक्षिणेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उत्तरेमध्ये थोरात-कोल्हे आणि विखे यांची साखर पेरणी चर्चेत असताना आता दक्षिणेत आमदार राम शिंदे, आमदार नीलेश लंके, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा गोड फराळ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कुठे विरोधकांचे एकमेकांवर राजकीय बॉम्ब फुटत असताना कुठे एकमेकांना गोड फराळ भरवत नव्या राजकीय समीकरणांची फुलझडी फुलत आहे. याची जोरदार चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वीच भाजपचे माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी त्यांच्या बुऱ्हाणनगर गावात आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे, कार्डिलेंचे व्याही माजी आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप तसेच विविध राजकीय पक्षांचे महत्त्वाच्या नेत्यांनी शेजारी-शेजारी बसत मिसळपाव आणि दिवाळीच्या गोड पदार्थांचा आस्वाद घेतला. आज चौंडीत राजकीय फराळ दिसून आला.

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या आमदार राम शिंदे यांच्या चौंडी गावातील तसेच आमदार नीलेश लंके यांच्या हंगा गावात या आमदारांनी गुरुवारी आयोजित केलेल्या फराळ कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. गेल्या काही महिन्यांपासून आमदार लंके आणि आमदार शिंदे जवळ आल्याचे आणि विविध कारणांनी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध पुढे येत आहेत. अर्थात याला राजकीय किनार आहे, असेही बोलले जातेय.

आज एकाच दिवशी लंके आणि शिंदे यांनी फराळाचा कार्यक्रम आपापल्या गावात ठेवलेला असला तरी आमदार लंके यांनी सकाळीच चौंडी गाठत राम शिंदे यांचा फराळ त्यांच्या सोबत घेतला. या वेळी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव या वेळी आमदार शिंदे आणि आमदार लंके यांनी एकमेकांना गोड बालुशाही भरवत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

यानंतर माध्यमांशी बोलताना लंके यांनी आपण पक्षात असतानाही पालकमंत्री असलेल्या राम शिंदे यांनी मला जिल्हा परिषद माझ्या गटातील कामांना निधी देत खूप मदत केली. विरोधी पक्षात असतानाही आमचा स्नेह कायम होता आणि आतातर आम्ही महायुतीमध्ये एकत्र आहोत. त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमात कसलेही राजकारण न आणता मी चौंडीत त्यांच्या कडनफराळाला आलो असल्याचे सांगत राजकीय बोलणे टाळले.

चौंडी गाव आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेडमध्ये आहे. यावर काल पारनेरला रोहित पवार आले म्हणून तुम्ही चौंडीत आलात का ? या प्रश्नावर लंके यांनी राजकारणात कौटुंबिक संबंध सर्वांशी जोपासले पाहिजे ही आपली संस्कृती आहे. आमदार शिंदेंनी मला फराळाचे आमंत्रण दिले आणि मी आलो, बाकी इतर गोष्टीशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
आज माझ्याही घरी फराळाचा कार्यक्रम असून, आमदार शिंदेंही माझ्याकडे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच कारण दिवाळीचा फराळ असला तरी यानिमित्ताने शिंदे-लंके यांच्या वाढलेल्या गाठीभेटी भविष्यात राजकीय बॉम्ब फोडणार, अशीच चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.




